– आचारसंहितेमुळे प्रलंबित रु. 177.64 कोटीच्या विकास कामांना निवडणूक आयोगाची परवानगी
नागपूर :- नागपूर शहरातील अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या नाग नदीसह पिवळी आणि पोहरा नदीच्या संरक्षक भिंती व रस्त्यांच्या १७७.६४ कोटींच्या १२० विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आचारसंहितेमुळे शहरात थांबलेली पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने नागपूर महानगर पालिकेला परवानगी दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून परवानगी देणारे पत्र मंगळवारी राज्याच्या नगरविकास विभागाला देण्यात आले असून, त्यामुळे मनपाला विविध विकासकामांचे कार्यादेश देता येणार आहेत. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागांतील मुलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता नदीच्या संरक्षक भिंती व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी प्राप्त झाली आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
नागपूर शहरात गत वर्षी २२ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागांतील मुलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता येणा-या खर्चाला यापूर्वी महाराष्ट्र शासनाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.
नागपूर शहरातील अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली व त्यामुळे अनेक भागांत मोठे नुकसान झाले होते. शहरातील ७२ ठिकाणी नदी, नाल्यांच्या भिंती तुटल्या होत्या. तसेच ४८ विविध रस्ते देखील खराब झाले होते. या मूलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी शासनाला सादर केलेल्या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य सरकारने नागपूरसाठी विशेष आर्थिक पॅकेज जारी केले होते. त्या अनुषंगाने मनपाद्वारे ७२ नदी, नाल्यांच्या १५१.५१ कोटी व ४८ रस्ते यांच्या २६.१३ कोटी अशा १२० कामांच्या १७७.६४ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती.
अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या संरक्षक भिंती व रस्ते, फुटपाथ, पाणी वाहून नेणारे नाले, चेंबरची कामे सुरू करण्याची निविदा प्रक्रिया मनपा कडुन सुरू करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागल्याने उर्वरित कामे सुरू होऊ शकली नाही. यासंदर्भात 30 एप्रिल रोजी मा. मुख्य सचिव यांनी घेतलेल्या बैठकीत नागपूर लोकसभा निवडणुकीचे मतदान पहिल्याच टप्प्यात झाल्याने व ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक असल्याने विशेष परवानगी महानगरपालिकेकडून मागण्यात आली होती. मा. मुख्य सचिव यांच्यामार्फत भारतीय निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले होते. याला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाला यासंदर्भात आयोगाकडून परवानगी देणारे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे प्रलंबित अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या नाग नदीसह पिवळी आणि पोहरा नदीच्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच नागपूर शहरातील नाग नदीसह पिवळी आणि पोहरा या नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यापूर्वी प्रमुख तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून त्यादृष्टीने गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. त्यानुसार दिनांक 15 जुन 2024 पुर्वी सर्व नदीचे स्वछतेचे कार्य मनपा तर्फे पुर्ण करण्यात येणार आहे.