नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतिभावंतांचा सन्मान नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवतेचा ध्यास यांतून जन्मलेल्या पेटंट महोत्सवाला पेटंट फेस्टला) शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, संशोधक, नवउद्योजक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपूर शहरामध्ये दडलेल्या बौदधिक प्रतिभेची चुणूक यानिमिताने प्रकर्षाने दिसून आली. त्यामुळे या उपक्रमानंतर नागपूर शहराला नवसंकल्पनांचे शहर म्हणून ओळखले जाईल याची खात्री आहे.
व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन प्रस्तुत ‘पेटंट आणि आयडियाज फेस्ट’चा महाअंतिम पुरस्कार सोहळा दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे संध्याकाळी ०५:३० वाजतापासून नियोजित आहे. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ‘पेटंट फैस्ट’ या उपक्रमाचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा जी यांच्या हस्ते दोन्ही गटांमधून निवडण्यात आलेले १० उत्कृष्ट पेटेंटधारक आणि १० अभिनव संकल्पनाधारकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व सहभागी विद्यार्थी आणि स्पर्धकांना सहभागिता प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल. उल्लेखनीय म्हणजे १०+ पेटंट्स नावे असलेल्या ‘पेटंट धारकांना’ देखील यावेळी गौरवण्यात येणार आहे.
तत्पूर्वी पेटंट फेस्ट ची निवड फेरी दिनांक ०८ ऑगस्ट २०२३ रोजी दत्ता मेघे मेडिकल कॉलेज, वानाडोंगरी येथे पार पाडली. नागपूर शहरातील बुद्धिवंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या फेरीमध्ये विविध ज्ञानशाखेच्या ४१० पेटेंट धारकांनी सहभाग घेतला. तसेच तब्बल विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या ४० परीक्षकांनी सहभागी स्पर्धकांच्या पेटंट्सची पडताळणी केली.
तर दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी आयडियाज फेस्टच्या निवड फेरीमध्ये विविध शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि विविध वयोगटातील ८१४ स्पर्धकांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. तर एकूण १२२४ नवकल्पना धारकांनी या फेरीमध्ये आपल्या संकल्पना सादर केल्या. ही निवड फेरी झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणारा (नागपूर) येथे पार पडली. येथे सहभागी स्पर्धकांच्या संकल्पनांची चाचपणी ६० तज्ज्ञ परीक्षकांद्वारे करण्यात केली. या फेरीमध्ये ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिक या वयोगटातील लोकांनी सहभाग नोंदवला.
भव्यदिव्य अश्या या पुरस्कार सोहळ्याला सर्व सहभागी विद्यार्थी स्पर्धक आणि नागपूरकर जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून पेटंट आणि आयडियाज फेस्ट’ या उपक्रमातील बुद्धिवंतांचे अभिनंदन करावे आणि नव्या संकल्पना आणि शोध परंपरेला आधुनिक आयाम देणाऱ्या या उपक्रमाचे उत्साहवर्धन करावे, असे आवाहन व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, सचिव मनोज चव्हाण आणि कोषाध्यक्ष डॉ. योगिता कस्तुरे यांनी केले आहे.
पेटंट फैस्ट हा उपक्रम राबविण्यात एनलायटन द सोल’, ‘पीआर टाइम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ‘आयटीक्राफ्ट टेक्नॉलॉजीस यांचे सहकार्य लाभले. अधिक माहितीसाठी ९७६६५९०११९ या क्रमांकावर संपर्क करा आणि www.patentfest.com ला भेट द्या.