नागपूर :-भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, रासेयो प्रादेशिक संचालनालय यांच्या सौजन्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय एकता शिबिरात देशातील अकरा राज्यातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. शिबिरा दरम्यान नागपूर शहरातील विविध स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. नागपूरचे वैभव पाहून विद्यार्थी भारावून गेले. आपसूकच ‘नागपूर हे सुंदर शहर’ असल्याचे भावोद्गार त्यांनी काढले.
शिबिरातील स्वयंशस्तीसह नागपूर शहराची ओळख व्हावी म्हणून विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ऐतिहासिक इमारत बघितली. ऐतिहासिक इमारतीमधील दीक्षांत सभागृह पाहून विद्यार्थी थक्क झाले. या सोबतच मेट्रो वारी देखील विद्यार्थ्यांनी केली. त्यांच्या संस्कृतीचे दर्शन नागपूरकरांना व्हावे म्हणून पारंपरिक देशात विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. मेट्रोच्या प्रवासाचा आनंद देखील विद्यार्थ्यांनी घेतला. या सोबतच दीक्षाभूमी, सेंट्रल म्युझियम, झिरो माईल, फ्रीडम पार्क, विवेकानंद स्मारक, स्वामीनारायण टेम्पल, फुटाळा फाउंटन आदी भागांची पाहणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत रासेयो प्रादेशिक संचालनालयाचे डॉ. कार्तिकेयन, विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्यासह कार्यक्रम अधिकारी व रासेयो विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.