– श्रध्दानंद अनाथालयास सदिच्छा भेट
नागपूर, दि. 8 : अनाथ बालकांचे जीवन सुसह्य करुन, त्यांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी शासनाव्दारे विविध संगोपन योजना राबविण्यात येत आहेत. अनाथांच्या संगोपनात खासगी अनाथालयांचेही मोठे योगदान आहे. या अनाथालयातील मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.
श्रध्दानंद अनाथालयास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सदिच्छा भेट देऊन बालकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. महिला व बालविकास उपायुक्त रवी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे, श्रध्दानंद अनाथालयाच्या सचिव डॉ. निशा बुटी, सहसचिव गितांजली बुटी, कोषाध्यक्ष व्ही. सी.भरतीया, सदस्य कल्याणी बुटी आदी यावेळी उपस्थित होते.
अनाथ बालकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेत तीन टक्के राखीव निधीची तरतूद केली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात पाच टक्के निधीची तरतूद केली आहे. या निधीतून त्या-त्या क्षेत्रातील अनाथालय, वसतिगृहांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करुन द्यावा. नवजात बालकांसाठी आवश्यक सुविधांची त्याठिकाणी प्राधान्याने तजवीज करण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक अनाथालयांना महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन तेथील प्रश्नांच्या निराकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. अनाथालयातील बालकांना सुदृढ व निरोगी जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्या म्हणाल्या.
श्रद्धानंद अनाथालयाच्या सचिव डॉ. निशा बुटी यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांना विविध सुविधांची, उपक्रमांची माहिती दिली. नवीन इमारत बाधंकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. संस्थेचे हे कार्य निरंतर चालू राहण्यासाठी अनाथालयाच्या प्रलंबित प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करण्यात यावा, अशी मागणी डॉ. बुटी यांनी केली.
मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवजात बालक कक्षाला भेट देऊन बालकांची व तेथील सुविधांची पाहणी केली. भोजन, निवारा, कौशल्य विकास प्रशिक्षण आदी कक्षांना भेटी दिल्या. अनाथालयाची इमारत व परिसर आणखी सुंदर होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन यशोमती ठाकूर यांनी दिले.