25 ते 27 मे 2022 या कालावधीत आयोजन
भंडारा, दि. 23 : उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास व तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि युथएड फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. उद्यमिता यात्रा 10 मे पासून मुंबई येथून सुरू झाली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून जनजागृती करत ही यात्रा 25 मे 2022 रोजी भंडारा येथे दाखल होणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 40 दिवस, सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये 40 उद्योजकता प्रशिक्षक सहभागी होणार असून हे प्रशिक्षक सुमारे 40 हजाराहून अधिक युवकांना भेटतील, त्यांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देतील. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये उद्योजकतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे उद्योगाच्या नवनवीन संकल्पना आहेत अशा युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. युवकांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम यात्रेदरम्यान राबविण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या उद्योजकता प्रशिक्षणाचा कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे.
युवकांचा कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्ट अपचा विकास या माध्यमातून राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. या यात्रेचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर यात्रेचे नियोजन जिल्हा स्तरावर युवा रुरल असोसिएशन करत आहे. तरी जास्तीत जास्त नवउद्योजकांनी सदर यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केलेले आहे.