चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, सूचना व प्रतिक्रियांसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य गरजेचे असल्याने दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी / माजी मनपा सदस्य यांच्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील नवीन मतदारांची नोंदणी करणे,दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे तसेच ९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचे तपासणी करून मतदार यादीच्या तपशिलात काही आक्षेप असल्यास दवे व हरकती स्वीकारणे बाबत वेळापत्रक घोषित करण्यात आले असुन ३ व ४ नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकरीता अचूक मतदार यादी तयार करतांना काही अडचणी निर्माण झाल्या असता, राज्य निवडणुक आयोग यांनी बैठक घेऊन अडचणी दूर करण्यास विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित बी.एल.ओ./पर्यवेक्षक व पथक प्रमुख यांचे आदेश निर्गमित करण्यात आले असुन त्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम २९ नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे.तसेच या उपक्रमाची प्रभावी व यशस्वीरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरीता दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी / माजी मनपा सदस्य यांच्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत करण्यात आली आहे.