नागपूर :- येथील राजराजेश्वरी मंदिर, अत्रे ले आऊट, कोतवाल नगर येथे हिंदु जनजागृती समिती अंतर्गत आरोग्य साहाय्य समिती द्वारे CPR प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. CPR म्हणजे ‘हृदय – श्वसन पुनरुज्जीवन तंत्र ‘. गंभीर स्थितीतील रुग्णासाठी वैद्यकीय सहाय्य मिळेपर्यंतची संजीवनी होय ! या तंत्राने अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. अलिकडे वाढत्या ताण तणावामुळे आणि बदललेल्या जीवन शैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला हा त्रास होऊ लागला आहे. अशावेळी अधिकाधिक व्यक्तींनी CPR शिकणे ही काळाची गरज आहे. यासाठी अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या वतीने डॉ. शीतल दलाल, भूलतज्ञ डॉ. रश्मी शिंगाडे आणि भूलतज्ञ डॉ. तपस्या धवने यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या सुरुवातीला समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिराचा २२ जणांनी लाभ घेतला. या प्रशिक्षणाच्या वेळी प्रत्यक्ष करायच्या कृती डमीवर (बाहुल्याच्या स्वरूपातील निर्जिव मनुष्य) करून दाखवल्या. शिबिरात आरोग्य साहाय्य समितीचे विदर्भ समन्वयक डॉ. थोटे उपस्थित होते.
१.शिबिरामध्ये प्रात्यक्षिक शिकायला मिळाल्याने आत्मविश्वास वाढला. असे सगळ्यांनी सांगितले.
२. ऑनलाईन वर्गापेक्षा प्रत्यक्ष विषय चांगल्या प्रकारे आकलन होतो, तसेच त्याची गंभीरता कळते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
३. प्रशिक्षक म्हणून आलेल्या डॉक्टरांनी आरोग्य साहाय्य समितीचा हा उपक्रम जाणून घेऊन समिती चांगले प्रयत्न करत आहे असे गौरोवोद्गार काढले. तसेच भविष्यातही अशा प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी सिद्धता दर्शवली.
शिबिराच्या समरोप प्रसंगी नागपूर जिल्हा प्रथमोचार सेविका स्मिता दाणी यांनी समितीद्वारे घेण्यात येणार्या विनामूल्य ‘ प्रथमोपचार’ वर्गात अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन समाज साहाय्य करण्यास सिद्ध होण्याचे आवाहन केले.