– विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा
नागपूर :- उत्तम नर्सरी, संत्र्याची गुणवत्ता आणि मार्केटिंग या त्रिसूत्रीतून विदर्भातील शेतकऱ्यांना उत्पादन आणि उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने वनामती सभागृह येथे आयोजित संत्रा उत्पादकांच्या कार्यशाळेत त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. आशीष देशमुख, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार प्रताप अडसड, आमदार श्याम खोडे, आमदार उमेश यावलकर, सीआरआरआयचे संचालक डॉ. घोष, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी, अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, आनंदराव राऊत, सुधीर दिवे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. या कार्यशाळेत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमधून संत्रा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
ना. गडकरी म्हणाले, ‘स्पेनच्या व्हॅलेन्शियामध्ये टँगो संत्र्याचे एकरी उत्पन्न २५ ते ३० टन आहे. विदर्भातील संत्र्याचे एकरी उत्पन्न चार ते सहा टन आहे. हे उत्पन्न २० टनच्या वर जाईल, असा निर्धार केला पाहिजे. त्याचा विदर्भावर मोठा सकारात्मक आर्थिक प्रभाव पडेल.’
‘शेतकऱ्यांपुढे अडचणी आणि समस्या खूप आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी सारेच लोक प्रयत्न करत आहेत. आपण अपयशातून शिकले पाहिजे. जेवढे खोलात जाऊन अभ्यास करू, तेवढ्या नव्या गोष्टी शिकायला मिळतील. हे सारे प्रयत्न करण्यामागे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, उत्पन्न आणि उत्पादन वाढले पाहिजे हा उद्देश आहे. विदर्भातील शेतकरी जिज्ञासू आहेत. अभ्यासू आहेत. त्यांची परिस्थिती नक्की बदलेल. फक्त शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, असsही ते म्हणाले.
‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असं आपण म्हणतो. पण बीज उत्तम नसेल तर फळ कसे गोड येणार? उत्तम नर्सरी आणि रोगमुक्त रोपे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी नर्सरी अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे. स्पेनमध्ये एका हेक्टरमध्ये संत्र्याची ८२० झाडं असतात आणि आपल्याकडे ३४० झाडं असतात. त्यांनी झाडे वाढवलीच. पण उत्पादन वाढवताना पॅकेजिंग आणि मार्केटिंगचाही विचार केला. त्याच आधारावर व्हॅलेन्शियाचा संत्रा जगभर पोहोचला. व्यावसायिक दृष्टिकोन, गुणवत्ता, उत्तम नर्सरी, मार्केटिंग त्यातून आपल्यालाही हे शक्य आहे. पण आपल्यापुढे असलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रयोगांमधूनच मिळतील,’ असेही ना. गडकरी म्हणाले.
ऑरगॅनिक खतांचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे. शेतात गांडुळ खत, ऑरगॅनिक खत, कंपोस्ट खत तयार केले पाहिजे. जमिनीतील ऑरगॅनिक कार्बन ०.७५ किंवा ०.८० झाला तर विदर्भातील शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्यावर भर द्यावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
दोन किंवा पाच एकर शेती असलेले शेतकरी मोठे प्रयोग करू शकत नाही. फार्मर प्रोड्युस कंपनी सुरू केली तर तेथून कमी खर्चात भाड्याने यंत्र-सामग्री उपलब्ध होऊ शकते, असा उपाय देखील त्यांनी सूचवला.