डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी यंत्रणांनी योग्य समन्वयाने उपक्रमांचे नियोजन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयाने विविध उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येतात, त्यांना आवश्यक सोयी सुविधा संबंधित यंत्रणांनी उपलब्ध करुन द्याव्यात. जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम विनाअडथळा पार पडतील, यादृष्टीने पोलिस प्रशासनाने काटेकोर व्यवस्था ठेवावी, तसेच जयंतीदिनी चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर आधारित ‘भीमपहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संबंधितांना सूचित केले.

सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जाणारे समाजभूषण पुरस्कार प्रलंबित असून त्यांचे वितरण करण्यात यावे, तसेच या पुरस्कारांसाठी प्राप्त अर्जदारांसोबतच उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाने स्वतः पुढाकार घेऊन पुरस्कार द्यावा, असे सूचित केले. इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

महाड येथे २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक भेट देतात, त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी देखील संबंधित यंत्रणांनी चोख तयारी ठेवावी. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन महाड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सभांचे नियोजन करण्याची खबरदारी घ्यावी. वाहतूकीची कोंडी न होता नागरिाकंना विनासायास त्या ठिकाणी येता जाता येईल, यादृष्टीने वाहतूक पोलीस प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना आठवले यांनी संबंधितांना दिल्या. पोलीस प्रशासन, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची, सोयी सुविधांची सविस्तर माहिती यावेळी संबंधितांनी दिली.

मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, यांच्यासह गृह विभाग, महानगरपालिका तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणाप्रमुख तसेच माजी मंत्री अविनाश महातेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, यांच्यासह इतर संबंधित बैठकीला उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जळगाव येथील रेमंड कंपनीसंदर्भात कामगार हिताचा निर्णय घेणार - कामगार मंत्री सुरेश खाडे

Fri Mar 3 , 2023
मुंबई – कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून जळगाव येथील एमआयडीसीमधील रेमंड लिमिटेड कंपनी पुन्हा सुरू झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कामगार हिताचा निर्णय घेतला जाईल, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री सुरेश खाडे म्हणाले, रेमंड लिमिटेड एमआयडीसी जळगाव या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com