महापौरांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा : ४५० बेड्स, ११०० ऑक्सिजन सिलींडर, पुरेसा औषधसाठा
नागपूर : जगातील अनेक देशांमध्ये संक्रमणाचा धोका वाढलेल्या कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटच्या संभाव्य धोक्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. नव्या व्हेरियंटच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी मनपाच्या आरोग्य यंत्रणेद्वारे सुरू असलेली कार्यवाही आणि मनपाकडे असलेली आरोग्य सुविधा यासंदर्भात शुक्रवारी (ता.३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला.
महापौर सभागृहामध्ये महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या आढावा बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी गोवर्धन नवखरे यांच्यासह सर्व झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महापौरांनी ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटची माहिती त्याचा धोका आणि मनपाची तयारी यासंबंधी माहिती जाणून घेतली. सुरूवातीला झालेल्या संशोधनात ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग जास्त असल्याचे दिसून आले. आता मात्र या व्हेरियंटच्या संक्रमणाचे प्रमाण जास्त असले तरी त्याच्या संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी असल्याचे दिसून येत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली. राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार शहरात दाखल होणा-या विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असणा-या प्रवाशांविषयीची नियमावली राबविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ५ डिसेंबरला नागपुरात दाखल होणा-या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेविषयी मनपाद्वारे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. ५ डिसेंबर रोजी सकाळी ६.४५ वाजता नागपूर शहरात शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमान दाखल होणार आहे. या विमानाने येणा-या प्रवाशांमध्ये ‘ओमायक्रॉन’चा धोका असलेल्या देशातील प्रवाशी पार्श्वभूमी असलेल्या प्रवाशांना आधीच अधोरेखित करण्यात येणार असून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाशांची विमानात बसण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी केली जाते त्यानंतर निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच विमानात प्रवेश दिला जातो. विमानातून उतरल्यानंतर सुद्धा पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असून निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाईल. गृह विलगीकरणादरम्यान मनपाची चमू दुस-या, चवथ्या आणि सातव्या दिवशी संबंधित प्रवाशाच्या घरी भेट देउन त्याची माहिती घेत राहणार आहे. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मनपाच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या बेड्स, औषध आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबतचा सुद्धा महापौरांनी आढावा घेतला. डॉ.संजय चिलकर यांनी सांगितले की, मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये सध्या ४५० बेड्सची उपलब्धता असून ११०० ऑक्सिजन सिलींडर सुद्धा उपलब्ध आहेत त्यावरून इतर ५०० बेड्सवर सुविधा होउ शकेल. याशिवाय पुरेसा औषधसाठा सुद्घा उपलब्ध आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एम्स, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णसंख्या ५०टक्के पर्यंत आल्यास मनपामध्ये आरोग्य कर्मचारी संख्या सुद्धा वाढविण्यात येईल, असेही डॉ.चिलकर यांनी सांगितले.
घाबरू नका, सतर्क रहा : महापौर दयाशंकर तिवारी
‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका असला तरी घाबरून जाण्यापेक्षा प्रत्येकाने सतर्क राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या देशात लसीकरण जास्त झाले तिथे या व्हेरियंटचा धोका कमी दिसून येत आहे. नागपूर शहर लसीकरणाच्या बाबत मुंबई, पुणेनंतर तिस-या क्रमांकावर आहे. ही सुखद बाब आहे. शहरातील ९८ टक्के नागरिकांनी पहिला डोज घेतला आहे. इतरांनीही लसीकरणासाठी पुढे यावे, ज्यांचा दुसरा डोज बाकी त्यांनी विहित कालावधी पूर्ण झाला असल्यास त्वरीत घ्यावा. मनपाकडे प्राप्त माहितीनुसार नागपूर शहरात विदेशातून प्रवास करून आलेल्या १०१ प्रवाशांची नोंद आहे. या सर्व प्रवाशांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटच्या धोक्यापासून आपणासह इतरांचाही बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. आपण विदेशातून प्रवास करून आले असल्यास मनपाला त्वरीत माहिती द्या. कुणी माहिती लपवित असल्याचे आढळल्यास त्याची सुद्धा माहिती मनपास देण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने मनपा प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. आपली सतर्कता ही आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरवासीयांना केले आहे.
दिनेश दमाहे
9370868686