नागपूर,दि.17 : नागपूर-इटारसी तिसऱ्या लाईनसाठी भूसंपादन करताना कळमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्तेच राहिले नाहीत. रेल्वेने तूर्तास कोणतेही काम करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी त्यांना प्रथम रस्ते उपलब्ध करावेत. त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी मार्ग करुन द्यावा. त्यानंतर आपल्या कामाला गती द्यावी, असे आदेश पशुसंवर्धन दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले.
आज छत्रपती सभागृहात झालेल्या बैठकीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी या सूचना दिल्यात.
आजच्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
यावेळी या बैठकीत कोहळी-मोहळी, खापरी कोठे, ऐलकापार रिठी, कोहळी, चाकडोह या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या वहिवाठीचा रस्ता बंद झाल्याबाबत, कळमेश्वर ब्राम्हणी, घोराड क्रॉसिंग गेट बंद करण्याच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत गावांच्या सरपंचासोबत मौका पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पंधरा दिवसात यासंदर्भात रेल्वेकडून कारवाई झाल्याचा अहवाल मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कळमेश्वर ब्राम्हणी मोठा पूल जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत गेट बंद होणार नाही असेही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.