– चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात पार पडली विविध विषयांवरील आढावा बैठक
चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून त्रयस्थ सर्वेक्षण करून योजनेतील त्रुटी व नागरिकांच्या तक्रारी दूर कराव्या, असे आदेश प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन) यांनी दिले. चंद्रपूर शहर महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी विविध विषयांवर राज्यमंत्री तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयुक्त विपीन पालीवाल यांनी अमृत योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील २५ हजार घरांना पाणी आणि ५० हजार नळ जोडण्या देण्यात आल्याची माहिती महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली. तसेच रस्त्यांचे सिमेंट-कॉंक्रीटिंग व गट्टू लावणे आदी कामे पूर्ण करण्याआधी नळ जोडण्या व त्यातील गळतीची तपासणी करणे आवश्यक आहे आणि हे काम नियमित सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. सदर बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, स्थायी समिती सभापती संदीप आवारी तसेच बैठकीकरीता निर्देशित संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, नगरसेवक, पक्षीय नेते उपस्थित होते.

दरम्यान चंद्रपूर शहरातील लाल-निळी पूररेषा बाधितांना दिलासा देण्यासाठी सीडब्ल्यूपीआरएस, पुणे यांच्याकडून पुन्हा सर्वेक्षण करून घ्यावे, तसेच सर्वेक्षणासाठी अपेक्षित ७०-८० लाखांच्या खर्च मंजुरी संदर्भात पालकमंत्र्यांशी तसेच जलसंपदा मंत्री, गृहनिर्माण विभाग मंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले. तसेच यासंदर्भात पूर्वीच्या शासन निर्णयानुसार बांधकामांना परवानगी देण्यात यावी, असे निर्देश देखील त्यांनी मनपा प्रशासनाला दिले.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर तसेच विरोधी पक्षातील नेते यांचे आक्षेप ऐकल्यानंतर मनपा प्रशासनाला योग्य त्या सूचना राज्यमंत्री यांनी केल्या. सदर योजनेसंदर्भात शासनाकडून मंजूर झालेल्या मनपाच्या तिन्ही आराखड्यांच्या अनुषंगाने अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना विशेषतः झोपडपट्टी भागातील रहिवाश्यांना जागेचे पट्टे देण्याची कार्यवाही मनपा करणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हायला हवा, यासाठी कृती कार्यक्रम राबवा असे निर्देशही यावेळी मंत्री महोदयांनी मनपा प्रशासनाला दिले. 

सिटीपीएस परिसरातील उंच झुडुपे साफ करा – राज्यमंत्री तनपुरे यांचे आदेश
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (सिटीपीएस) परिसरात सध्या वाघाची दहशत आहे. सदर भागात वाढलेली झाडे-झुडुपे यांची उंची अधिक असल्याने वाघ दिसणे कठीण होते. त्यामुळे त्याला पकडण्यात अडचणी येत असल्याचे वनविभागाने मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत इको-प्रोचे बंडू धोतरे देखील उपस्थित होते. मागील दोन दिवसांत या परिसरात घडलेल्या वाघासंदर्भातील घटनांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे यांनी सिटीपीएस प्रशासनाला परिसरातील झुडूपे साफ करण्यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.