नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे यादृष्टीने चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्चपूर्वी निर्धारित सर्व विभागाने कर वसुलीचे उद्दिष्टे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी दिले. तसेच नागरिकांनी सुद्धा वेळेत कर भरा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शुक्रवारी (ता. ७) स्थायी समिती सभापती कक्षात जलप्रदाय विभाग, बाजार विभाग व जाहिरात विभाग आणि नगर रचना विभागाच्या वसुलीबाबत बैठक पार पडली. यावेळी कार्यकारी अभियंता श्रीकांत वायकर, मनपाचे बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, ओसीडब्ल्यूचे जनरल मॅनेजर अमोल पांडे उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी पाणी बिलासंबंधी नागरिकांच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यासमोर मांडल्या. तसेच ज्या नागरिकांना वाढीव पाणी बिल प्राप्त झालेला आहे अशा नागरिकांचे पाणी बिल तपासून बिलांची रक्कम कमी करून देण्याच्या सूचना दिल्या. सोबतच मनपाचे उत्पन्न वाढविण्यासोबतच नागरिकांना पाणी कराच्या शास्तीत सवलत देण्यासाठी योजना राबविली तर मनपाच्या तिजोरीत जवळपास १५ कोटी रुपयांपर्यंत ज्यादा कर जमा होऊ शकेल, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी स्थायी समिती सभापतींनी जलप्रदाय विभाग, बाजार विभाग व जाहिरात विभाग आणि नगर रचना विभागाच्या वसुलीबाबत आढावा घेतला. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पाणी कर वसुलीचे १९५ कोटी एवढे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत १२५ कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील आर्थिक वर्षात पाणी करातून १६२ कोटी रुपये जमा झाले होते. तसेच मनपाद्वारे सुरु करण्यात आलेल्या अभय योजनेचा लाभ जवळपास ३६ हजार नागरिकांनी घेतला होता, अशी माहिती कार्यकारी अभियंता श्रीकांत वायकर यांनी दिली.
२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी बाजार विभागाचे कर वसुलीचे १० कोटी ६० लाख एवढे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत मनपाकडे ७ कोटी रुपये जमा झाले आहेत. बाजार विभागात २०२०-२१ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२० पर्यंत ४ कोटी ८३ लाख रुपये कर जमा झाला होता तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२१ पर्यंत ६ कोटी ८४ लाख रुपये जमा झाले आहेत. म्हणजेच या आर्थिक वर्षात जवळपास २ कोटी रुपयाचा कर जास्त जमा झाला असल्याचे बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य यांनी यावेळी सांगितले.
बाजार विभागातर्फे कर न भरणाऱ्या दहाही झोन मधील दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत दहाही झोन मधील १२७ दुकानांना ३० दिवसांच्या आत दुकाने रिकामी करण्याबाबत नोटीस देण्यात आले आहेत तर ७६६ दुकानांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेले आहेत, अशी माहिती बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य यांनी यावेळी दिली. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सर्व दुकानदारांनी वेळेत कर भरावा, असे आवाहन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी यावेळी केले.
२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी नगर रचना विभागाचे कर वसुलीचे ८६ कोटी १९ लाख एवढे उद्दिष्ट आहे. मात्र यात स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी वाढ केली आहे. आतापर्यंत मनपाकडे १३५ कोटी १८ लाख ८२ हजार ६६७ रुपये जमा झाले आहेत. यापैकी ऑनलाईन पद्धतीने ५ कोटी ४३ लाख ३३ हजार ३०८ रुपये तर ऑफलाईन पद्धतीने १२९ कोटी ७५ लाख ४९ हजार ३५९ रुपये जमा झाले असल्याची माहिती नगर रचना विभागामार्फत यावेळी देण्यात आली.