नागपूर :- केंद्र सरकारचे विविध प्रकल्प आणि विकासकामांमुळे देशातील तरुणांना मोठ्या प्रमाणात थेट नोकऱ्या मिळाल्या. आजही रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ७० हजार तरुणांना सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र दिले जात आहे. येत्या काळातही रोजगाराची असंख्य दालने खुली होतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) रोजगार मेळाव्यात केले.केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अख्त्यारित राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात देशभरातील ४३ केंद्रांवर ७० हजार तरुणांना विविध मंत्रालयांमधील तसेच विभागांमधील सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोट दाबून केला. त्यानंतर व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी देशभरातील ४३ केंद्रांवर उपस्थित तरुणांशी संवाद साधला. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रास्ताविक केले. नागपूरमधील २५० तरुणांना वनामतीच्या सभागृहात ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी केंद्रीय वित्तीय सेवा विभागाचे अपर सचिव ज्ञानतोष रॉय, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक विजय कांबळे, विभागीय व्यवस्थापक वैभव काळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. गडकरी यांनी प्रातिनिधिक स्वरुपात विजय नेरकर, श्रृतिका महाजन, नुशरत खातून मोहम्मद अंसारी, प्रेरणा चांभारे आणि शिवनारायण गुप्ता यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
अंगभूत कौशल्यांसोबत आपली नाळ तुटू देऊ नका. नोकरी करताना देखील कौशल्ये विकसित करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्यमशीलता कायम ठेवा, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला. ‘देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराची गरज आहे. केंद्र सरकारने विविध प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नागपूरला मिहान येथील विविध कंपन्यांमध्ये आम्ही ६८ हजार तरुणांना थेट रोजगार मिळवून दिला. पुढील वर्षभरात ही संख्या एक लाखावर नेण्याचा माझा प्रयत्न आहे. पण तुमच्यात काही अंगभूत कौशल्ये असतील तर तुम्ही ती विकसित करा आणि त्या आधारावर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचाही प्रयत्न करा,’ असे गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
‘रोजगार कशात आहे ओळखा’
नोकरी असो वा स्वयंरोजगार, प्रत्येक ठिकाणी स्पेशलायझेशन आवश्यक आहे. त्यामुळे सतत नवीन गोष्टी शिकत राहिले पाहिजे. ज्यांना आज इथे नियुक्ती पत्र मिळाले त्यांनी, आणि जे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनीही, कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रोजगार कशात आहे हेही शोधावे लागेल, असेही ना. गडकरी म्हणाले.
या विभागांमध्ये मिळाल्या नोकऱ्या
रेल्वे मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, डाक विभाग, गृह, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, महसूल, अणुऊर्जा, वित्तीय सेवा विभाग आदी मंत्रालय व सरकारी विभागांमधील नोकऱ्यांसाठी तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक आफ इंडिया यासह विविध बँकांचाही यामध्ये समावेश आहे.