– गावागावात वैद्यकीय उपचारासाठी यंत्रणा पोहोचणार
नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय यंत्रणा आणखी सक्रिय करण्यासाठी आज झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी ‘डॉक्टर आपल्या दारी ‘, या अभिनव उपक्रमाची घोषणा केली.
13 तालुका आरोग्य केंद्र, 11 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 53 प्राथमिक आरोग्य केंद्र, 316 उपकेंद्र असा प्रचंड मोठा ताफा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा आहे. ग्रामीण भागातील आरोग्याची काळजी घेताना या यंत्रणेला येणाऱ्या अडचणी ही त्यांनी या बैठकीमध्ये जाणून घेतल्या.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय ढवळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रेवती साबळे यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विविध स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. मनुष्यबळाची कमतरता, पायाभूत सुविधांमध्ये बळकटीकरण, डाटा एन्ट्री ऑपरेटरची कमतरता, कार्यप्रणालीचे संगणकीकरण, औषधोपचारांमध्ये आधुनिकता, रखरखाव, दुरुस्तीसाठी निधी आदी महत्वपूर्ण बाबींवर यावेळी चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड काळामध्ये मिळालेल्या अतिरिक्त वाहनांद्वारे आठवड्यातून काही दिवस ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचण्याच्या आवाहन यावेळी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केले. लोकांपर्यंत आपली यंत्रणा पोहचल्यामुळे,ग्रामीण भागातील आरोग्य उत्तम राहील. त्यामुळे ‘डॉक्टर आपल्या दारी’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या अभियानाचा अधिकृत प्रारंभ लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मेयो व मेडिकलच्या कामकाजाचाही जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
मध्यभारताचे आरोग्य केंद्र असलेल्या नागपूर शहरात शेकडो रुग्ण रोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होतात. नागपूर येथील वैद्यकीय यंत्रणेवर सर्वांचा विश्वास असून गरीबांसाठी हे दोन्ही हॉस्पिटल अद्ययावत असणे आवश्यक आहे. आजच्या बैठकी दरम्यान त्यांनी शहरातील दोन्ही हॉस्पिटलच्या अधिष्ठातांशी संपर्क साधून आढावा घेतला.