– बुटीबोरी वासीयांच्या पिण्याचा पाण्याचा पेच सुटला
– बुटीबोरी वासीयांना मिळणार मुबलक व शुद्ध पाणी
संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी
– नगराध्यक्ष बबलू गौतम व पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश
– आ समीर मेघे यांचे बुटीबोरी वासीयांनी मानले विशेष आभार
नागपूर २० जाने:- बुटीबोरी येथील जनतेच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून;येथील जनतेसाठी ६.९६ दस लक्ष घन मीटर पिण्याच्या पाण्याकरिता मंजुरी मिळाली आहे. १२० कोटी रुपयांच्या कामाला प्रत्यक्षात लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे व नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी दिली.
बुटीबोरी येथे दूषित पाण्याचा पुरवठा हा विषय अनेक वर्षांपासून कायम आहे.यावर मात मिळविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमा अंतर्गत ७ कोटी ४५ लक्ष रुपये खर्च करून जल शुद्धीकरण यंत्राचे काम केले होते.हे काम पूर्ण होताच राज्याचे तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते दि १२ फेब्रु २०१८ ला उदघाटन ही करण्यात आले होते.परंतु उदघाटनाच्या ५ वर्षानंतरही कारखानदाराच्या बेजबाबदारपणामुळे औधोगिक क्षेत्रातून नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे व शासनाच्या निःशब्द धोरणामुळे आजपर्यंत येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले नाही.शिवाय बुटीबोरी शहरातील नागरिकांना शुद्धपाणी मिळावे या हेतूने करोडो रुपये खर्ची घालून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आल्यानंतरही दूषित पाणी प्यावे लागत असल्याने ते करोडो रुपये सुद्धा पाण्यातच गेले असे जनतेचे म्हणणे होते.
सतत होणाऱ्या दूषित पाण्याच्या पुरवठ्या मुळे त्रस्त होऊन येथील जमतेने अनेकदा बुटीबोरी नगरपरिषदे समोर धरणे आंदोलन,मोर्चे सुद्धा आणले.नगरपरिषदे कडून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता कधी टँकर ने तर कधी एम आय डी सी कडून सुद्धा पाणीपुरवठा केला.परंतु २०११ च्या जनगणानेनुसार २९,६६७ असलेली लोकसंख्या आजघडीला १,२५००० झाली असून यावर कायमस्वरूपी समस्या निकालात काढण्याकरिता बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे व नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी ही शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या हिंगणा विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष व लाडके आमदार समीर मेघे यांचेकडे लावून धरली होती.त्या अनुषंगाने वडगाव प्रकल्पाच्या जलाशयातुन नगर परिषद बुटीबोरी येथे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता कार्यकारी संचालक,विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ,नागपूर यांचेशी चर्चा करून प्रस्ताव देण्यात आला.त्यानुसार शासन निर्णयाच्या परिपत्रक २.२ अन्वये मा मंत्री यांच्या मान्यतेने सदर योजनेसाठी सन २०५५ ची लोकसंख्या विचारात घेऊन बुटीबोरी नगरपरिषदेला ६.९६ दस लक्ष घनमिटर पाणी आरक्षणास मंजुरी देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी दिली.बुटीबोरी येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार लक्षात घेऊन २०५५ पर्यंत पाण्याची समस्या जाणवू नये म्हणून ६.९६ दलघमी पाणी मंजूर करून मैलाचा दगड इतके गाठून दिल्याबद्दल आमदार समीर मेघे यांचे नगराध्यक्ष बबलू गौतम व पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे यांनी बुटीबोरी वासीयांतर्फे आ समीर मेघे यांचे जाहीर आभार मानले.