Ø अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ
Ø ॲपद्वारे अर्ज भरल्यास पुन्हा भरण्याची गरज नाही
यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना सुलभपणे घरबसल्या अर्ज करता यावे यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. ज्या महिलांनी अद्यापर्यंत अर्ज सादर केले नाहीत, अशा महिला या पोर्टलद्वारे अर्ज भरू शकतात.
योजनेची घोषणा केल्यानंतर जास्तीत जास्त महिलांचे अर्ज कमी कालावधीत भरून घेता यावे म्हणून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. सोबतच नारी शक्ती दूत ॲप सुरु करण्यात आले आहे. जास्तीत जास्त महिलांचे अर्ज भरून घेता यावे म्हणून शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, जीवनोन्नती अभियानाचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी शासनाने आता www.ladkibahin.maharashtra.gov.in हे पोर्टल सुरु केले आहे. ज्या लाभार्थी महिलांनी अद्यापपर्यंत अर्ज भरलेले नसतील त्या महिला घरबसल्या अगदी कमी कालावधीत स्वत: अर्ज भरू शकतात किंवा अंगणवाडी सेविकेद्वारे अर्ज भरण्याची सुविध उपलब्ध आहे. यापुर्वी नारी शक्ती दुत ॲपद्वारे अर्ज भरलेल्या महिलांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यात डीबीटीद्वारे प्रत्येक महिन्यास 1 हजार 500 रुपयांचे आर्थिक सहाय्य जमा केले जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी महिला 21 ते 65 वर्ष वयोगटातील असावी. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. लाभार्थी महिलेल्या कुटुंबांचे वार्षिक उत्तन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र किंवा पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदान कार्ड देखील ग्राह्य आहे.
ज्या पात्र इच्छुक लाभार्थी महिलांनी अद्यापपर्यंत अर्ज भरलेले नाहीत, त्या लाभार्थ्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.