चंद्रपूर – १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १ ते ३० नोव्हेंबर २०२१पर्यंत आहे. दावे व हरकती स्विकारण्याबाबत विशेष मोहीम २७ व २८ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत चंद्रपूर शहरातील अनेक तरुणांनी ऑनलाईन मतदार नोंदणी करीत आहेत.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होत आहे. त्या अनुषंगाने शहरातील मतदारांचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने, प्रशासनाच्या मार्फतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यात आल्या. विविध वॉर्डात सभा आयोजित करून मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
सोमवार, दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याची विशेष मोहीम शनिवार, दि. १३ नोव्हेंबर व रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. तसेच शनिवारी दि. २७ नोव्हेंबर व रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी दावे व हरकती स्विकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दावे व हरकती सोमवार, दि. २० डिसेंबर २०२१ पर्यंत निकालात काढण्यात येतील. विशेष मोहीमेच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारणार आहे. ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घ्यावे व उपलब्ध संधीचा अवश्य लाभ घ्यावा. बुधवार दि. ५ जानेवारी २०२२ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.