– संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आवाहन
नागपूर :- येत्या २० ऑगस्ट रोजी नागपूर शहराचे माजी महापौर तथा सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांचा वाढदिवस आहे. विविध सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या संदीप जोशी यांचा वाढदिवस सामाजिक कार्याद्वारेच साजरा व्हावा याकरिता पुष्पगुच्छ, केक, भेटवस्तू न आणता त्यांच्या सामाजिक कार्यात हातभार लावावा, असे आवाहन जोशी यांचे स्वीय सहायक नीरज दोंतुलवार यांनी केले आहे.
‘सेवा ही समर्पण’ हेच जीवनाचे ध्येय ठरवून गरीब-अनाथ मुलांवर मायेचे पांघरून घालण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून संदीप जोशी करीत आहेत. असंख्य गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेला सोबत पालकत्व प्रकल्प, मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकरिता सुरु असलेला दीनदयाल थाली प्रकल्प आणि गोरक्षण धाम या सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून जनसेवेचा यज्ञकुंड निरंतर सुरु आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून असंख्य गरजूंना हक्काचा आधार मिळतो आहे. सेवेचे हे कुंड निरंतर धगधगत राहावे यासाठी आपण सर्व देखील आपले सहकार्य देऊ शकतो. माजी महापौर संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलेही कार्यक्रम आयोजित न करता किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येताना हार, पुष्पगुच्छ, केक हे सर्व न आणता त्याऐवजी ही रक्कम सामाजिक कार्यासाठी दान करून सहकार्य करता येईल.
संदीप जोशी २० ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ वाजतापर्यंत त्यांच्या राहते घरी लक्ष्मीनगर येथे सर्वांना भेटणार आहेत. यावेळी त्यांना हार, पुष्पगुच्छांची भेट न देता त्यांच्या सामाजिक कार्यात हातभार लावून अनोखी भेट देऊया, असे आवाहन नीरज दोंतुलवार यांनी केले आहे.