एनएलयू नागपूरला जगातील श्रेष्ठ विधी विद्यापीठ बनवावे

–  केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री  नितीन  गडकरी  यांचे आवाहन,राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ग्वाही, एनएलयूच्या वारंगा कॅम्पस येथील वसतीगृहाचे उद्घाटन

नागपूर  – नागपूरमधील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी  विद्यापीठ-एनएलयूने स्वतःच्या जबाबदारीवर तसेच शासनाच्या मदतीने  विद्यापीठाचे  विस्तारीकरण करून  एनएलयू नागपूरला जगातील श्रेष्ठ विधी विद्यापीठ बनवावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन  गडकरी यांनी आज  केले . ते   नागपूरच्या वर्धा रोडवरील वारंगा कॅम्पस येथील एनएलयूच्या वसतीगृह व अम्नेटी बिल्डींगचे  उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते . या  वसतीगृहाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. नरसिम्हा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विजेंदर कुमार  प्रामुख्याने उपस्थित होते .

नागपूर  खर्‍या अर्थाने शैक्षणिक हब बनत असून येथील एम्स, सिम्बॉयसिस विघापीठ ,भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था तसेच  अभियांत्रिकी संस्था यामध्ये  आता राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या रूपाने  भर पडली आहे. मिहानमध्ये   नामांकित माहिती-तंत्रज्ञानाच्या कंपन्या आल्या असून गेल्या दोन वर्षात 56 हजार  लोकांना येथे रोजगार मिळाला आहे. नागपुर वरून खापरीपासून बुटीबोरीपर्यंत येणारा  उड्डाणपूल हा डबल डेकर होणार असून हा रस्ता सुद्धा सहापदरी होणार आहे. वारंगा येथे विधी विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर एक स्पेशल जंक्शन  तयार करण्यात येणार असून  यामुळे  विद्यापीठातून रोडवरून परत येण्यासाठी वळसा घालण्याची गरज पडणार नाही, असे गडकरींनी यावेळी सांगितलं .  लोकशाहीसाठी  विधायिका, कार्यपालिका ,न्यायपालिका त्याचप्रमाणे प्रसार माध्यम हे चार स्तंभ असतात. स्वतंत्र तसेच निष्पक्ष न्यायपालिकेवरच आपली लोकशाही टिकून आहे , असेही   त्यांनी स्पष्ट केले .

जोपर्यंत राष्ट्रीय महत्त्वाच्या शैक्षाणिक संस्था निर्माण होत नाही,  या संस्थामधून मानव संसाधन  तयार होत नाही तोपर्यंत विकासाची संकल्पना पूर्ण होऊ शकणार नाही. कायद्याचे राज्य आणि न्याय प्रदान प्रक्रिया ही अंतिम व्यक्तीपर्यंत  पोहचली पाहिजे.  ही विश्वसनीयता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी विधी  क्षेत्रात  वैश्विक मान्यता असलेले मानव संसाधन   तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. हे वसतिगृह केवळ रहिवासाची जागा नसून ज्या प्रमाणे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना ज्या घरात राहून अभ्यास केला होता.  त्या घरात बाबासाहेबांच्या संशोधनाच्या स्मृती ठेवलेल्या आहेत . आता या घराला लोक भेट देऊन या वास्तूला एक प्रेरणादायी वास्तू म्हणून मानतात.  त्याचप्रमाणे राष्ट्रीय विधी  विद्यापीठातील या वसतिगृहात येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहील अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासणार नाही , अशी ग्वाही फडणवीस यांनी विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांना दिली.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा विकास झाला आहे. जमीन संपादनचा अडथळा दूर झाला आहे .आता याच परिसरात 3 राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि एनएलयुचा समावेश आहे . या विद्यापीठाच्या उभारणीसाठी विद्यमान आणि गेल्या सरकारमधील सर्वच सत्ताधा-यांनी यांनी  विद्यापीठाला मदत केली ,याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सर्वोच्च  न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. नरसिम्हा यांनी  विद्यार्थ्यांना सत्याचा शोध घेणारे आणि वैज्ञानिक  दृष्टिकोन  असणारे वकील न्यायाधीश बनण्याचे आवाहन यावेळी केले. कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली  नागपूर एनएलयु  कॅम्पस गेल्या 2 वर्षात वाढला असून शैक्षणिक खंड 2021 मध्ये बांधण्यात आले होते, तर विद्यार्थ्यांसाठी निवासी हॉलचे उद्घाटन आता यावर्षी होत आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.  विजेंदर कुमार   यांनी सांगितले.

यावेळी एनएलयू च्या कॅम्पस उभारणीसाठी परिश्रम घेणारे अभियंते, अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एनएलयूचे कुलसचिव डॉ. आशिष दिक्षीत यांनी केले.  या कार्यक्रमाला विद्यापीठाचे  शिक्षक, विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनीधी उपस्थित  होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपुर मधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात - केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी  

Mon Jul 11 , 2022
नागपूर – नागपुर मधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या  बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात होत आहे.  एकाच पिलर वर उड्डाणपूल आणि मेट्रो असल्याने तसेच महा मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सोबत काम केल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली असून कामही गुणवत्तापूर्ण झाले  आहे. नागपूर शहरात असलेला डबल डेकर उड्डाणपूल पुण्यातही बांधला जाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com