नवीन वर्षात मुंबईकरांना शासनाची मोठी भेट

 – ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषण

–  निर्णय तत्काळ अंमलात आणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे .

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख , महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती,   मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्वानाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१७ ला  निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली असून आज आणखी एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे.  मुंबई ही  देशाची आर्थिक राजधानी आहे. १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना ही अडीअडचणीच्या काळात नेहमी मुंबईकरांच्या मदतीला धावून गेली आहे. शिवसेनाप्रमुख स्वत: मुंबईतील कामांची पहाणी करत असत.  मी सुद्धा पूर्वीपासून पालिकेची जी कामे सुरू आहेत तिथे आवर्जून पाहणीसाठी जायचो, मग ते नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल  किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल. आता स्वतः आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन या कामांची पाहणी करतात. सुविधा देतांना आपल्याला  मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे.  मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे.कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. आणि म्हणूनच शिवसेनेने मुंबईकरांसाठी फक्त जाहीरनामे दिले नाहीत तर वचने दिली आणि जी कामे करता येतात त्यांचीच आश्वासने दिली आहेत. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते.  जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. आम्ही हे असे अजिबात करत नाहीत. आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले आहेत. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल.

५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वात मोठी भेट – एकनाथ शिंदे

मुंबईकरांचा  ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून १६  लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून  नवीन वर्षाचं मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वारंवार विचारायचे. शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आभार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की ,मी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा निश्चितच एक क्रांतिकारी निर्णय असून लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या महत्वाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नववर्ष के आगमन पर कोराडी के महालक्ष्मी मंदिर में भक्तो का ताता लगा रहा

Sat Jan 1 , 2022
कोरडी –  शनिवार की सुबह माताजी के दर्शन। लंबी कतार लगी रही। यहां कोरोना भीड़ में खो गया लग रहा था। श्रद्धालुओ की आस्था कोरोना पर बड़ी लग रही थी। ( फोटो : डॉ. प्रवीण डबली) Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com