खासदार क्रीडा महोत्सव 2023
खो-खो (विदर्भस्तरीय)
गुरूवार, 12 जानेवारी 2023
विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर
खो-खाे : अंतिम लढतीत विदर्भ क्रीडा मंडळ काटोलचा पराभव
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ संघाने आणि पुरुषांमध्ये विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल संघाने अजिंक्यपद पटकाविले.
महिलांच्या अंतिम लढतीत नव जयहिंद क्रीडा मंडळाने काटोल येथील विदर्भ क्रीडा मंडळाला 13-9 अशी गुणसंख्या नोंदवित 4 गड्यांनी पराभूत केले व बाजी मारली. नव जयहिंद क्रीडा मंडळाची प्रीती ठाकरगे दोन्ही डावांत एकून 9 मिनिटे 40 सेकंद खेळली व 4 गडी बाद केले. विदर्भ क्रीडा मंडळाची जाली गज एकूण 4 मिनिटे 20 सेकंद खेळली व 2 गडी बाद केले. तिस-या स्थानाच्या लढतीत मराठा फ्रेंड्स क्लब अमरावती संघाने क्रीडाज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर संघाला 9-8 म्हणजे सामन्याचे 4 मिनिटे शिल्लक ठेवत एका गड्याने नमविले.
पुरुष गटात काटोल येथील विदर्भ युथ क्रीडा मंडळ आणि विदर्भ क्रीडा मंडळ यांच्यात चुरशीची लढत झाली. विदर्भ युथ क्रीडा मंडळने विदर्भ क्रीडा मंडळ संघाला अतिरिक्त वेळेत 9-3 म्हणजे 6 गड्यांनी पराभूत केले. विजयी विदर्भ युथ संघाचा फैजान पठाण साडेतीन मिनिटे खेळला व 5 गडी बाद केले. पराभूत संघाचा लकी शेंगर 5 मिनिटे 20 सेकंद खेळला व 7 गडी टिपले.
तिसऱ्या स्थानाच्या परतवाडा यथील तुळजाई क्रीडा मंडळाने नागपूरच्या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाला 17-15 म्हणजे 2 गड्यांनी नमवित कांस्यपदक जिंकले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी आंतरराष्ट्रीय खो-खोपटू नरेंद्र शाह आणि खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ खो-खो संघटनेचे अध्यक्ष सुहास पांडे, सचिव सुधीर निंबाळकर, नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे, अश्फाक शेख, प्रकाश चंद्रायण आदी उपस्थित होते. संचालन प्रा. पराग बन्सोले यांनी केले तर आभार संजय घवघवे यांनी मानले.