– 20 ते 25 मार्च भव्य प्रदर्शनाचे आयोजन
नवी मुंबई :- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी “नव तेजस्विनी महोत्सव 2025” हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत गुरुवार दि. 20 ते मंगळवार दि. 20 मार्च, 2025 दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे आयोजीत करण्यात आला आहे. अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाने दिली आहे.
या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात महाराष्ट्रातील 140 पेक्षा जास्त स्टॉल्स सहभागी होणार आहेत. विविध जिल्ह्यांतील महिला बचतगटांनी तयार केलेली उत्कृष्ट उत्पादने प्रदर्शित केली जाणार आहेत. हस्तकला, बांबू उत्पादने, हामतग वस्त्रप्रकार, पारंपरिक ग्रामीण उत्पादने यासारख्या विविध उत्पादनांचा आनंद या प्रदर्शनात घेता येणार आहे. खवैयांसाठी ग्रामीण शेतकरी महिला गटांव्दारे तयार केलेले खास परंपरिक पदार्थ उपलब्ध होणार आहेत.
या महोत्सवाच्या उद्घटन समारंभाला मान्यवर उपस्थित राहणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरणार असून, महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी आणि महिलांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेला चानला देण्यासाठी माविम “सुवर्ण महोत्सव नव तेजस्विनी 2025” हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
या प्रदर्शनाला नागरीकांनी आवर्जून भेट द्यावी. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या महिलांच्या कुशल हातांनी तयार केलेल्या साहित्य व वस्तुंची खरेदी करावी, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक महेंद्र गमरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.