संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 13 लक्ष 1 हजार 667 रुपयाची तडजोड रक्कम वसूल
कामठी :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. वादपूर्व व दाखल अशी एकूण 220 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले असल्याची माहिती कामठी न्यायालयातून प्राप्त झाली.
9 डिसेंबर ला तालुका विधी सेवा समिती कामठी अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय कामठी येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालत मध्ये एकूण दोन पॅनल ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये पॅनल क्र 1 मध्ये दिवाणी व फौजदारी न्यायाधीश ए ए कुळकर्णी होते त्याचबरोबर पॅनल क्र 2 मध्ये न्यायाधीश एस एस जाधव होते तर पॅनल एडव्हॉकेट म्हणून हुमा यझदानी होते. या लोक अदालत मध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कामठी तालुक्यातील वादपूर्व प्रकरणातील बँक,ग्रामपंचायत ,ईलेक्ट्रीसीटी बिल यांची एकूण 1218 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील 64 प्रकरणे निकाली काढून या प्रकरणामध्ये 5 लक्ष 92 हजार 217 रुपयांची तडजोड वसुली करण्यात आली व प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी एकूण 156 प्रकरणे निकाली काढून त्यातून 7 लक्ष 9 हजार 450 रूपयाची वसुली करण्यात आली .अशी एकूण 220 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण 13 लक्ष 1 हजार 667 रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. या लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी कामठी तालुका वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी वर्ग ,व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.