दरवर्षी 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सर्व स्तरावरील ग्राहकांना वीज बचतीचे महत्व अवगत करून दैनंदिन जीवनामध्ये वीजेचा वापर अत्यावश्यक वेळीच केला जावा या प्रमुख उद्देशामुळेच या सप्ताहाचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धनाचा वाव आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे महत्त्व पाहता केंद्र शासनाने ऊर्जा संवर्धन कायदा 2001 पारित केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून वीज वापर कमी होण्यासाठी विविध योजना तयार करण्याच्या अनेक तरतूदी आहेत.
मानवी जीवनात सामान्यतः अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात. परंतू जागतीकी करणाच्या आजच्या युगात “ऊर्जा” अर्थात “वीजे”चाही मूलभूत गरजांमध्ये समावेश झालेला आहे. आज ऊर्जेची गरज नैसर्गिक इंधनाचे साठे जसे, कोळसा, खनिज तेल, वायू यावरच भागवली जाते. दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वापर होत असलेली वीजेची निर्मितीदेखील मोठ्या प्रमाणावर कोळशापासूनच केली जाते. ग्लोबल वार्मिंग सारख्या जागतिक स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे जात असताना वीजेचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी वीज संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणं अत्यंत गरजेचे आहे.
भारताने पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. भारताची ऊजां क्षेत्रातील कामगिरी ही निश्चितच कौतूकास्पद आहे. आपली दळणवळण व्यवस्था ही पूर्णतः कच्च्या तेलावर, जीवाश्म इंधनावर आधारित आहे. भारताचा 2000 सालापासून वीज वापर जवळपास दुप्पट झाला आहे. जो जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश आहे. सन 2007 साली दरडोई 672 किलोवॅट विजेचा वापर सन 2022 साली 1255 किलोवॅट झालेला आहे. ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट या संस्थेने वाढती लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यामुळे भारतातील उत्सर्जन अलिकडच्या दशकात वाढले असल्याचे नमूद केले आहे. या वाढीमुळे भारत देश, चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश बनला आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मार्च 2021-22 च्या अहवालानुसार भारताची एकूण वीज निर्मिती ही 14 लाख 84 हजार 463 गिगावॉट असून यामध्ये कोळशाची वीज ही 11 लाख 14 हजार 811 गिगावॉट एवढी आहे. तर पाणी 1 लाख 51 हजार 627 गिगावॉट तसेच नवीकरणीय ऊर्जेचे प्रमाण 1 लाख 70 हजार 912 गिगावॉट एवढे आहे. भारताची वीज निर्मिती आजही कोळशावर अवलंबून आहे. दिवसेंदिवस विजेची वाढत जाणारी मागणी आणि पुरवठा यात ताळमेळ घालण्याच्या दृष्टिने विजेची बचत ही काळाची गरज बनलेली आहे.
देशात इंधनाचे साठे मर्यादीत आहेत. कोळसा, तेल व गॅस मोठया प्रमाणावर आयात केली जातात. त्यामुळे आपल्या देशातील इंधन साठे भावी पिढीला उपयोगी ठरतील यासाठी वीजेचा वापर अधिकाधिक कार्यक्षमतेने व काटकसरीने करणे गरजेचे आहे. अहवालानुसार वीज संवर्धनासाठी पथदिवे आणि पाणीपुरवठा या क्षेत्रामध्ये 20 टक्के, घरगुती क्षेत्रात 20 टक्के, व्यावसायिक क्षेत्रात 30 टक्के, उद्योग क्षेत्रात 25 टक्के आणि कृषी क्षेत्रात 30 टक्के याप्रमाणे आपण वीजेची बचत करू शकतो. याकरिता वीज संवर्धनासाठी उपलब्ध होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठीवीज संवर्धन व वीज कार्यक्षमता ही संस्कृती सर्व क्षेत्रात नागरिकांनी अंगिकारणे अत्यावश्यक आहे. यासाठी विदयार्थ्यांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनी जागरूकपणे वीजेचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर व्यक्तिशः प्रयत्न करण्याबरोबरच सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी त्यांच्या अखत्यारितील क्षेत्रात वीज संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याशिवाय वीज कार्यक्षमतेच्या निकषांवर आधारीत नवीन इमारती, रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा यंत्रणा यांची उभारणी करणे अत्यावश्यक आहे. आपल्या जीवनातील केंद्रस्थानी असलेल्या ऊर्जेवाबतची आपली उदासिनता व बेफिकीरी आपल्या व भावी पिढी करिता घातक ठरू शकते. म्हणूनच ऊर्जेजेंविषयी अधिक जागरूकता दाखवत ऊर्जेचे संवर्धन, म्हणजेच वसुंधरेचे रक्षण हा मूलमंत्र मनाशी घट्ट बाळगून ठेवायला हवा.
दैनंदिन जीवनातील वीज बचतीच्या काही सुलभ सुचना :
1. गरज नसेल तेंव्हा विद्युत उपकरणे आणि दिवे बंद करणे.
2. वापरात नसेल तेंव्हा विद्युत उपकरणांचे मेन स्वीच बंद ठेवा. उदा. टि.व्ही. संगणक इ. यामुळे 15 टक्के वीज बचत होते.
3. कार्यालयात व घरात सुर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.
4. घरातील आतील भिंतींना व छताला फिकट रंग द्यावा.
5. फ्रिज मध्ये जास्त बर्फ साचू देऊ नका तसेच वारंवार दरवाजा उघडुनका.
6. वीजेच्या अती उच्च मागणी काळात म्हणजेच सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 6 ते 10 या वेळेत मोठ्या प्रमाणावर मोठ्या वीज उपकरणांचा वापर टाळावा.
7. वातानुकुलीन यंत्र (ए.सी.) पंख्यापेक्षा 15 पट जास्त वीज खर्च करते. एसीचे तापमान 25अंश से. एवढे ठेवावे.
8. प्रकाश योजनेसाठी वीज बचत करणारे एल.ई.डी. बल्ब व ट्युबचा वापर करावा त्यामुळे 80 टक्के वीज बचत होते.
9. बी.ई.ई. स्टार लेबल अथवा आय, एस. आय, प्रमाणित उपकरणांचा वापर करावा व त्याची नियमीत देखभाल करावी, शक्यतो सौर, पवन, बायोगॅस, बायोमास यासारख्या अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत साधनांचा वापर करावा.
10. कमी अंतरासाठी वाहनांचा वापर टाळा, 1 ते 2 मजल्यासाठी लिफ्टचा वापर टाळावा.