– नवीकरणीय ऊर्जेसाठीही दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा मान
मुंबई :- जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील आमुलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृती बद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आले. यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल देखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला.
आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड 2024 चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला, केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद देव यांच्याहस्ते महावितरणचे मुख्य अभियंता (देयके व महसूल) संजय पाटील आणि वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या पुरस्कारांबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
वीज वितरण कंपनी म्हणून देशात नावलौकीक असलेल्या महावितरणने वीज क्षेत्रात पायाभूत आराखडा विकास, वीजबिलांच्या प्रक्रियेतील सुधारणा आणि जागतिक दर्जाची तत्पर ग्राहकसेवांना प्राधान्य देत आमुलाग्र सुधारणा सुरु केल्या आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना- 2.0 नुसार साकारले जात आहे. इतर राज्यांनी देखील या क्रांतीकारी योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास सुरु केला आहे.
छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात महावितरणने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपारंपरिक ऊर्जा वापरामध्ये देण्यात येणारे प्राधान्य व लक्षणीय कामगिरी तसेच केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला 19 जानेवारी 2022 रोजी रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज -2 अंतर्गत 19 जानेवारी 2024 पर्यंत दोन वर्षांमध्ये घरगुती ग्राहकांसाठी 100 मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते. महावितरणने हे उद्दिष्ट दि. 25 सप्टेबर 2023 रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले आहे.
महावितरणने वीज वितरण कंपनी म्हणून सुरू केलेल्या पायाभूत आराखडा विकासाच्या व ग्राहकसेवांच्या आमुलाग्र सुधारणा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात केलेली कामगिरी याची दखल घेऊन आयपीपीएआयच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर चार पुरस्कार प्रदान करून महावितरणला गौरविण्यात आले आहे.