मुंबई :- भाजपाशी विश्वासघात करत महाराष्ट्रात स्थापन केलेली सत्ता हातून गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सर्रासपणे जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा उद्योग सुरु केला आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली . भाजपा प्रदेश कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे ,सहप्रभारी सुमंत घैसास आणि प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते .
नारायण राणे म्हणाले की , विरोधकांनी अलिकडे बेळगाव, राज्यातील उद्योग बाहेर जाण्याच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे यातून विरोधकांचे सत्ता गेल्याचे वैफल्य दिसून येत आहे . हातात काहीच मुद्दे नसल्याने विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी आणि मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात सत्तेची सूत्रे अप्रत्यक्षरित्या हाती असताना सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवारांनी काय केले असा रोखठोक सवाल राणे यांनी उपस्थित केला.
राज्यातील एकही इंच जमीन कर्नाटकच काय कुठल्याही अन्य राज्याला कदापि दिली जाणार नाही अशी भाजपाची ठाम भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे, असे असताना नाहक भ्रमनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे अस राणे म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जहरी टीका कॉंग्रेसकडून होत असताना उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले . सावरकरांवर खोटीनाटी टीका करणा-या राहुलबाबांची आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याचे दिसत आहे असेही राणे यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या नावाचा वापर करून मते मिळवली , सत्तेची फळे चाखली त्याच भाजपाशी गद्दारी करून कॉंग्रेस- राष्ट्रवादी बरोबर जाणा-या उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवरायांची आठवण झाली नाही असे ही राणे म्हणाले.