– माजी मंत्री आणि एकेकाळचे कॉंग्रेसचे हेवीवेट नेते सतीश चतुर्वेदी यांना पुन्हा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत आहे. त्यामुळे नागपुरात पुन्हा अंतर्गत वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
नागपूर :- कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये आपआपसांत वाद नाहीत, असा एकही जिल्हा महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. असे म्हटले जाते की, कॉंग्रेसचे नेते द्वेषभावना मिटवून एकत्र येऊन लढले, तर त्यांना कोणत्याही पक्षाचा आधार घेण्याची गरज नाही. पण गेल्या कित्येक वर्षात असे बघायला मिळाले नाही. माजी मंत्री आणि एकेकाळचे कॉंग्रेसचे हेवीवेट नेते सतीश चतुर्वेदी यांना पुन्हा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत आहे. त्यामुळे नागपुरात पुन्हा अंतर्गत वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक नेत्यांसोबतची भांडणे आणि आपसातील वादामुळे बऱ्याच कालावधीपासून अलिप्त असलेले सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या गोंदिया या गृहजिल्ह्यात निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. स्थानिक नेत्यांसोबत चतुर्वेदी यांचे मतभेद सर्वश्रुत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून त्यांचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हान आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या समर्थकांसोबत चांगलाच राडा झाला होता. याच वादातून चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मुदतीच्या आतच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. यानंतर चतुर्वेदी फारसे सक्रिय झाले नव्हते.
आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच हात दिल्याने ते जोमाने कामाला लागणार असल्याचे दिसून येते. मात्र, यामुळे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा गट नाराज होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुत्तेमवार आणि चतुर्वेदी असे दोन गट नागपूरमध्ये कार्यरत आहेत. माजी मंत्री आमदार नितीन राऊत, आमदार सुनील केदार, माजी आमदार अशोक धवड चतुर्वेदी यांच्या गटात आहेत. आमदार विकास ठाकरे यांच्याकडे नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. चतुर्वेदी यांना परत प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याने शहरात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अनुभव, संघटन कौशल्याला प्राधान्य..
सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर सर्व नेत्यांनी फोकस केला आहे. याकरिता कुशल संघटक असलेल्या नेत्यांवर जबाबदारी सोपविली जात आहे. पटोले यांनी चतुर्वेदी यांचे संघटन कौशल्य आणि अनुभव लक्षात घेऊन गोंदियाची जबाबदारी दिली आहे. ७०च्या दशकापासून चतुर्वेदी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. पूर्व नागपूरमधून विधानसभेच्या निवडणुकीत ते चार वेळा निवडून आलेले आहेत. नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेटमंत्रीसुद्धा राहून चुकले आहेत.