मनपा आयुक्तांनी दिला ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ चा मूलमंत्र
नागपूर :- देशातील इतर शहरांपेक्षा नागपूर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावारूपाने यावे याकरिता संपूर्ण नागपूरकरांनी शनिवारी सकाळी (१७ सप्टेंबर) स्वच्छतेचा जागर केला. ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवा वर्ग, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मिळून नागपूर शहराला कचरामुक्त करण्याचा निर्धार केला. स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ या स्पर्धेचे सहभाग घेत नागपूर महानगरपालिकेच्या ‘नागपूर निती’ संघाने स्वच्छता ‘प्लॉग रन’ चे यशस्वी आयोजन केले. एक पाऊल स्वच्छतेकडे टाकत नागरिकांनी ‘प्लॉग रन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शहर कचरामुक्त होऊन स्वच्छ आणि सुंदर बनाव याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हा मूलमंत्र दिला.
केंद्र सरकारच्या पहिल्या स्वच्छ भारत अभियानाला ८ आणि स्वच्छ भारत अभियान-२ ला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त ‘इंडियन स्वच्छता लीग’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका ‘नागपूर निती’ या नावाने सहभाग घेतला असून त्या अनुषंगाने मनपाद्वारे स्वच्छता ‘प्लॉग रन’ चे आयोजन करण्यात आले.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सुनील उके, विजय गुरुबक्षणी, अनित कोल्हे, यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान, मनपाच्या ‘नागपूर निती’ संघाचे कर्णधार मेहुल कोसुरकर, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी, आर.जे.राजन, ग्रीन व्हिजीलच्या सुरभी जैस्वाल, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, महिमा सूरी यांच्यासह ग्रीन व्हिजिल फाउंडेशन, नागपूर सिटीजन फोरम, तेजस्विनी महिला मंच, देवता लाईफ फाउंडेशन, मॅट्रिक्स वारिअर्स, नागपूर प्लॉगगर्स, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन, एक वादळ भारताचं, अभिज्ञान फाउंडेशन, लीडर्स क्लब, आय क्लीन नागपूर, रॉबिन हूड आर्मी आदी स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, वाल्मिकी नगर मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसह सर्व सामान्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, घनकचरा, प्लास्टिक आणि ई-कचरा ही जागतिक समस्या बनले आहे. या कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे असून, अद्यापही नागरिकांना स्वतः जवळ असलेल्या ई कचऱ्याचे, प्लास्टिकचे, नेमके काय करावे, हे ठाऊक नसल्याने हा कचरा रस्त्याशेजारी पडून असल्याचे दिसते. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मानपद्वारे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देत असतानाच स्वच्छतेबाबत शहरात आवश्यक ते सर्व कार्य केले जात आहेत. तरी स्वच्छतेची सुरुवात नागरिकांनी स्वतः पासून करावी, याकरिता ‘माझी कचरा, माझी जबाबदारी’ हा स्वच्छतेचा कानमंत्र मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिला. याशिवाय स्वच्छतेची सुरुवात नागरिकांनी स्वतः पासून करायला हवी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच पुढील १५ दिवस स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रम शहरभरात राबविल्या जाणार असल्याचेही राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
प्लॉग रनची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसराच्या मुख्य द्वारापासून झाली झाली. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या नागपूर निती संघाचे कर्णधार मेहुल कोसुरकर यांच्या हातात ‘इंडियन स्वच्छता लीग’चा ध्वज सुपूर्द करून ‘प्लॉग रन’ ला सुरुवात केली. स्वतः आयुक्त आणि मनपाच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रस्त्यावरील कचरा गोळा केला व तो कचरा कुंडीत टाकला. त्याच्या पाठोपाठ असलेल्या उपद्रव शोध पथकाचे जवान, शाळेच विद्यार्थी व सर्व सामान्य नागरिकांनी श्रमदानाने प्लॉग रन साठी निर्धारित केलेला मार्ग स्वच्छ केला.
अंबाझरी स्थित स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात मॅट्रिक्स वारिअर्स या स्वयंसेवकांनी पथनाट्य आणि नृत्याच्या माध्यमांतुन जनजागृती केली. प्लॉग रन दीक्षाभूमी पोहोचल्यावर सहभागी सर्वानी दीक्षाभूमी परिसर स्वच्छ केला. यावेळी नागरिकांनी स्वच्छतेसाठी असेच पुढे यावे आणि नागपूरला स्वच्छ सुंदर शहर बनविण्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
वृत्तपत्र, प्लास्टिक, ई वेस्ट संकलनाची विशेष सोयी
स्वच्छ आणि सुंदर नागपूर उपक्रमासाठी नागरिकांनी स्वतःच्या घरचे जुने वृत्तपत्र, प्लास्टिक, ई-वेस्ट घेऊन येण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले होते. त्यास नागरीकांनी उत्तम साथ देत घरातील जुने वृत्तपत्रे ई वेस्ट प्लास्टिक पिशव्या आदी वस्तू आणल्या होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसराच्या प्रवेश द्वारा पूढे मनपा द्वारे ई-वेस्ट, वृत्तपत्र, प्लास्टिक पिशव्या असे तीन संकलन केंद्राची सोय केली होती. त्यात ६० किलो ई-वेस्ट, १८० किलो जुने वृत्तपत्रे आणि ८८ किलो प्लास्टिक जमा झाले, याशिवाय मार्गावरील २२७ पिशव्या कचरा संकलित करण्यात आला.
भारत माता जय च्या जयघोषाने दुमदुमला मार्ग
प्लॉग रन मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळा उत्साह दिसून आला. हातात स्वच्छता प्रतितयार करण्यात आलेले जनजागृती फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. कचरा संकलन करताना मनपाच्या वाल्मिकीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागींनी ‘भारत माता की जय वंदे मातरम सारख्या घोषणा दिल्या या घोषणांमुळे संपूर्ण मार्ग दुमदुमला.