राज्यात लाडकी बहीण योजनेचा “नागपूर पॅटर्न” प्रसिद्ध होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

– आदिती तटकरे यांच्या हस्ते कोराडी येथे अगरबत्ती युनिटचे उद्घाटन

– महिलांना फुडस्टॉल्स आणि धनादेशांचे वितरण

– लाडकी बहीण महिला सशक्तीकरण मेळावा

नागपूर :- ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेतील जवळपास 30 लाखांचा आर्थिक लाभ नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत जमा करून या योजनेच्या निधीचा योग्य विनियोगाचा आदर्श वस्तूपाठ नागपूर जिल्ह्यातील महिलांनी घालून दिला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसंदर्भातील हा ‘नागपूर पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध होईल, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे व्यक्त केला. तसेच, महिलांद्वारे निर्मित उत्पादनाच्या ऑनलाईन विक्रीसाठी ‘यशस्वीनी’ वेबपोर्टलवर उत्पादनांची नोदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिर परिसरात आदिती तटकरे यांच्या हस्ते अगरबत्ती युनिटचे उद्घाटन झाले. यानंतर आयोजित ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण मेळाव्यात’ त्या बोलत होत्या. आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सरपंच नरेंद्र धानोले आदी यावेळी उपस्थित होते.

आदिती तटकरे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊले उचलली आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ जमा करण्यात येतो. नागपुरात या योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत 31 ऑगस्टला 52 लाख महिलांच्या बँक खात्यात लाभ जमा करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील 3 हजार महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत 1500 पैकी 1000 रुपये असे जवळपास 30 लाख रूपयांचे भांडवल उभारले आहे.यातून महिला बचतगटांना गती मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट असून नागपूर जिल्ह्यातील महिलांनी यादिशेने पाऊले टाकल्याचे सांगत हा नागपूर पॅटर्न राज्यभरात प्रसिद्ध होईल असेही त्या म्हणाल्या. या योजनेच्या नोंदणीसाठी सप्टेंबर महिन्यात अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोराडी येथील अगरबत्ती युनिटच्या माध्यमातूनही महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगत त्या महिलांच्या उत्पादनाची ऑनलाइन विक्री करण्यासाठी ‘यशस्विनी पोर्टल’वर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला व बाल विकास विभागाने नुकतेच या पोर्टलची सुरुवात केली असून राज्यात माविम आणि उमेद च्या माध्यमातून 11 हजार महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनाची नोंदणी केली आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांची नोंदणी या पोर्टलवर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर जिल्ह्यात जिल्हा खनिकर्म निधीतून अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सायकल देण्याच्या संकल्पनेचे कौतुक करत या प्रस्तावास महिला बाल विकास विभागाने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात महिलाचालक असणारे 1400 पिंक रिक्षा सुरू करण्यात येईल व या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. जगदंबा महालक्ष्मी संस्थान कोरोडी येथे तसेच कामठी तालुक्यातही असे पिंक रिक्षा सुरू करण्यास विशेषबाब म्हणून मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूरद्वारे संचालित व जिल्हा नियोजन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अर्थ सहाय्यातून 10 प्रातिनिधिक फिरत्या फूड स्टॉलचे आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यांच्या हस्ते आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकाकडून महिला बचत गटांना देण्यात आलेल्या कर्जाचे धनादेश प्रातिनिधिक रित्या वितरीत करण्यात आले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नागपूरकरांचा सुखकर प्रवास

Tue Sep 17 , 2024
– नागपूर-सिकंदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती नागपूर :- ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस अतिशय कमी वेळात लोकप्रिय झालेली गाडी आहे. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता नागपूर-सिकंदराबाद गाडीमुळे नागपूरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) व्यक्त केला. ना. नितीन गडकरी व महाराष्ट्राचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!