– अमृत महोत्सवी वर्षात मनपाचे पदार्पण : वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचा ७४वा स्थापना दिवस रविवारी २ मार्च २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका ७४ वर्ष पूर्ण करुन ७५व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. मनपा स्थापनेच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे रविवारी २ मार्च रोजी मनपा मुख्यालयामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
मनपा मुख्यालयातील हिरवळीवर रविवारी सकाळी ९.३० वाजता मनपा स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी हे राहतील. मुख्य अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांची उपस्थिती असेल.
नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाद्वारे वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेचे लोकोपयोगी उपक्रम नागपूर शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा मनपाचा मानस आहे.
मनपाच्या स्थापना दिन समारंभाला शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.