नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा जिल्ह्यांमध्ये शांततेत मतदान पार पडले. सर्व जिल्हयांमध्ये जवळपास 86.23 टक्के मतदान झाल्याचे तसेच आकडेवारी अंतिम होण्याचे बाकी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, सर्व जिल्ह्यांमधून नागपूर येथील स्ट्राँगरुमकडे मतदान पेटया रवाना झाल्या आहेत. २ फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 22 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 7 वा.पासून दुपारी 3 वा. पर्यंत तर अन्य 5 जिल्ह्यांमध्ये सकाळी 8 वा.पासून दुपारी 4 वाजेर्पंत शांततेत मतदान पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर ९१.५३ टक्के मतदान झाले. नागपूर जिल्ह्यामध्ये 43 मतदान केंद्रांवर ८१.४३ टक्के मतदान झाले . भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर ८९.१५ टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर ८७.५८ टक्के मतदान झाले. वर्धा जिल्ह्यात १४ मतदान केंद्रावर ८६.८२ टक्के मतदान झाले . चंद्रपूर जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर ९१ .५३ टक्के मतदान झाले.
एकूण ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी आज एकूण ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात २० हजार ६६३ पुरुष तर १३ हजार ६८६ महिला मतदारांचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 3 हजार 211 मतदार असून आज ५६३ महिला आणि २ हजार ३७६ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदारांची एकूण संख्या 16 हजार 480 असून आज ७ हजार ८२ महिला आणि ६ हजार ३३८ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यात एकूण 3 हजार 797 मतदार असून आज १ हजार ५३ महिला आणि २ हजार ३३२ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया जिल्ह्यात एकूण 3 हजार 881 मतदार असून आज ९८९ महिला आणि २ हजार ४१० पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 7 हजार 571 मतदार असून आज २ हजार ३८८ महिला आणि ४ हजार ५६९ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वर्धा जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 4 हजार 894 असून आज १ हजार ६११ महिला आणि २ हजार ६३८ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नागपूरला मतदान पेटया रवाना
शिक्षक मतदारसंघासाठी पार पडलेल्या आजच्या निवडणुकीनंतर भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयातून मतदान पेट्या नागपूर येथील अजनी परिसरातील समुदाय भवनात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुमकडे रवाना झाल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व ४३ मतदान केंद्रांहूनही स्ट्राँगरुममध्ये मतदान पथके दाखल झाले आहेत. स्ट्राँगरुम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान पेटया सुरक्षित ठेवण्यात येतील. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वा. पासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
निवडणुकीत 22 उमेदवार
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सहा जिल्ह्यातील २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सतिश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष), प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष), डॉ. देवेंद्र वानखडे (आमआदमी पक्ष), राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष (युनायटेड)), अजय भोयर (अपक्ष), सुधाकर अडबाले (अपक्ष), सतिश इटकेलवार (अपक्ष), बाबाराव उरकुडे (अपक्ष), नागो गाणार (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), रविंद्रदादा डोंगरदेव (अपक्ष), नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष), निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष), नरेंद्र पिपरे (अपक्ष), प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष), इंजि. प्रो. सुषमा भड (अपक्ष), राजेंद्र बागडे (अपक्ष), डॉ. विनोद राऊत (अपक्ष), उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष), श्रीधर साळवे (अपक्ष), प्रा. सचिन काळबांडे (अपक्ष) आणि संजय रंगारी(अपक्ष) यांचा समावेश आहे.
वर्ष 2017 मध्ये 83.35 टक्के मतदान
विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी वर्ष 2017 मध्ये पार पाडलेल्या निवडणुकीत सरासरी 83.35 टक्के मतदान झाले होते. गडचिरोली जिल्ह्यात 88.43 टक्के मतदान झाले होते. नागपूर जिल्ह्यामध्ये 78.71 टक्के, भंडारा जिल्ह्यात 86 टक्के, गोंदिया जिल्ह्यात 90.21 टक्के, वर्धा जिल्ह्यात 80.39 टक्के तर चंद्रपूर जिल्ह्यात 89.38 टक्के मतदान झाले होते.