लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

– नागपूरसाठी 26 तर रामटेकसाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात*

– मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी 20 टेबल*

– कडेकोट पोलिस बंदोबस्त, अधिकृत पासशिवाय प्रवेश नाही*

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी कळमना मार्केट यार्ड येथे होणार आहे. यासाठी नागपूर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज मतमोजणीच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. इटनकर बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यावेळी उपस्थित होते. मतमोजणी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला असून प्रत्येक कक्षामध्ये 20 टेबलवर मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मीडिया सेंटर येथे जमा करावा लागणार आहे.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा आहेत. प्रत्येक विधानसभेसाठी २० टेबल असे एकूण एका लोकसभा मतदारसंघासाठी १२० टेबल म्हणजेच नागपूर व रामटेकसाठी एकूण २४० टेबल लागतील. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील चार अंगणवाडी केंद्रात 8 लक्ष रुपयांचा साहित्य घोटाळा

Mon Jun 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- अंगणवाडी श्रेणीवर्धन योजने अंतर्गत साहित्य पुरवठा करण्यासाठी कामठी तालुक्यातील अंगणवाड्याना प्राप्त निधीतून कामठी तालुक्यातील चार अंगणवाडी केंद्रात 8 लक्ष रूपयाचा साहित्य घोटाळा झाला असून यासंदर्भात कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी कामठी पंचायत समितीचे सिडीपीओ विरुद्ध नविन कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली आहे. अंगणवाडी श्रेणीवर्धन योजने अंतर्गत अंगणवाडयाना साहित्याचा पुरवठा करण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com