प्रत्येक गटासाठी १० पुरस्कार
नागपुरात ५० हजाराचा समुदाय धावणार
समन्वयातून योग्य नियोजन करा
नागपूर दि. ९: ‘ब्रेक द बायस’ अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी 13 मार्चला नागपुरात ५ किलोमिटर मॅराथॉन दौड आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन मोफत नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाने लिंक जाहीर केली आहे. या स्पर्धेसाठी ५ किमी व ३ किमी मॅराथॉनसाठी नोंदणी १२ मार्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार असून २ किमी रन फॉर फन या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुली राहणार आहे. प्रत्येक गटासाठी १० वेगवेगळे पुरस्कार असे जाहीर करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने घराघरातील मायलेकीने यामध्ये सहभागी होऊन नागपूरकराच्या मॅराथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनात आयोजित महिला मॅराथॉनची पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी त्याबोलत होत्या. अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे,जगदिश कातकर, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने मॅराथॉन नोंदणीसाठी https://forms.gle/aj4DTYYMDhuoULwa6 ही लिंक जारी केली आहे. या लिंकवर गेल्यानंतर या स्पर्धेतील आपली नोंदणी होणार आहे. ५ किमी, ३ किमी, २ किमी तीनही गटांसाठी प्रत्येकी १० बक्षिसे जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हयातील सर्वांना सहभागी होता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मॅराथॉनसाठी व्यवस्थापन योग्य करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. व्यासपिठ, पोलीस बंदोबस्त योग्य ठेवण्यासाठी समन्वयातून योग्य नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्या. वाहनासाठी मॉरिश कॉलेजमध्ये पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. मॅराथॉनसाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाद्वारे दोन ॲम्ब्युलंस ठेवण्यात येणार असून प्रथमोपचारासाठी पथक राहणार आहे. स्पर्धकांच्या उत्साह वाढविण्यासाठी डान्सचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये फक्त क्रीडा विषयक व राष्ट्रभक्तीपर गाण्यांचा सामावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही मॅरेथॉन स्पर्धा कस्तुरचंद पार्क येथून सुरू होऊन संविधान चौक, विधानभवन रस्त्याने, जपानी गार्डन, वॉकर स्ट्रीट, रामगिरी, जिमखाना, व्हीसीए चौक या ५ किलोमीटरच्या मार्गाने होईल. स्पर्धेचा समारोप कस्तुरचंद पार्क येथेच चौकात होईल.
मॅरेथॉन स्पर्धेत शाळेमधील ८,९ व ११ व्या वर्गातील फक्त मुली व त्यांच्या माता सहभागी होतील, तसेच महाविद्यालयीन तरुणींना देखील यामध्ये सहभागी होता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली.