माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मनपातर्फे ‘ सुंदर माझे घर स्पर्धे’चे आयोजन

– २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान करता येईल नोंदणी  
चंद्रपूर, ता. १९: नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन, प्रदूषण, अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर या विषयांबाबत जागरूकता यावी, याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सातत्याने उपक्रम राबविले जातात. आता याच मालिकेतील पुढचे पाऊल म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत ‘सुंदर माझे घर स्पर्धा – २०२२’ दिनांक २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
वाढते प्रदूषण व वातावरणीय बदल लक्षात घेता हरित आच्छादन वाढवणे व नैसर्गिकरीत्या उपलब्ध वस्तूंचा वापर करणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून ‘सुंदर माझे घर’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे.  या स्पर्धेच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक साधन सामग्रीच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार  आहे. नागरिकांनी आपल्या राहत्या घराची ठेवण, साजसज्जा व सुशोभीकरणाकरिता पर्यावरणपूरक साधनसामुग्रीचा वापर कसा केला आहे, हे या स्पर्धेच्या माध्यमांतून बघितले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धकांना दिनांक २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान https://tinyurl.com/ycknezb6 या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नागरिकांचे घर चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात असणे बंधनकारक आहे. स्पर्धेची नोंदणी व संबंधित फोटो व कागदपत्रे ऑनलाइन स्वरुपात दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये सादर करणे बंधनकारक आहे. ही स्पर्धा घराचे किंवा इमारतीचे बांधकाम किती आकर्षक आहे याच्यावर अवलंबून नसून नैसर्गिक पर्यावरणपूरक साधनसामुग्रीचा वापर करून घर सजविणे आवश्यक आहे. सहभागी नागरिकांनी दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये विचारलेली आवश्यक माहिती पूर्णपणे भरावी व संबंधित जिओटॅग व साधे फोटो अपलोड करावे. फोटो व्यवस्थित व चांगल्या गुणवत्तेचे असावे.
स्पर्धेचे परीक्षण आणि मूल्यमापनासाठी सहभागी स्पर्धकाने हरित आच्छादन वाढवण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न – जसे, घराच्या अंगणात बाग तयार करणे, टेरेस गार्डन करणे, किचन गार्डन करणे, बाल्कनी गार्डन करणे.इ. तसेच 3R (Recycle, Reuse, Reduce) तंत्राचा वापर करून विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना करून घर सुशोभित करणे (प्लास्टिक, पेपर, रिकामी बॉटल व इतर वस्तूंचा पुनर्वापर करून कलात्मक वस्तू तयार करणे, ओल्या कचऱ्यापासून घरी हरित खत तयार करणे, जल संधारण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे – रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या उपाययोजना करणे, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतास प्रोत्साहन देणे – घराच्या छतावर सोलर पॅनल बसविणे, घरात एलइडी लाइटचा वापर करणे या मुद्द्यांवर भर  देण्यात येईल. तसेच मनपाच्या मूल्यमापन समितीद्वारे सदर मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पर्धकांच्या घरी प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी competition.ccmc@gmail.com हा ई-मेल किंवा 8668583170 या मो. क्रमांकावर संपर्क साधता येईल.
पर्यावरण संवर्धनाच्या अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर आधारित या स्पर्धेत जास्तीतजास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सौ. राखी कंचर्लावार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोरोना बाधितांनी गृहविलगीकरणात काळजी घ्यावी

Wed Jan 19 , 2022
-आरोग्य विभागाचे आवाहन   भंडारा, दि. 19 : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तो सात दिवसात बरा होत आहे. गृहविलगीकरण कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे आढळली तरी तातडीने कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. वेळेत निदान व योग्य उपचार यामुळे कोरोना बाधितांना लवकर बरे वाटू लागते. त्यामुळे दुखणे अंगावर न काढता वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्याने उपचार सुरू करण्यात यावा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com