– पश्चिम नागपूरमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद
नागपूर :- गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जनतेशी प्रत्यक्ष संपर्क महत्त्वाचा आहे आणि हे काम फक्त कार्यकर्तेच करू शकतात. कारण त्यांनी केलेले कष्टच महत्त्वाचे असतात. मी माझ्या कार्यकर्त्यांना माझा परिवार मानतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) केले.
पश्चिम नागपूर येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत ना. नितीन गडकरी यांनी संवाद साधला. तेलंगखेडी बगीचा येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘माझे माझ्या मुलांवर जेवढे प्रेम आहे, तेवढेच माझ्या कार्यकर्त्यांवर आहे. कारण माझे राजकीय वारस माझे कार्यकर्तेच आहे. ते कायमस्वरूपी आहेत. जात-पात-धर्म मी मानत नाही. आपल्या पक्षाबद्दल विरोधक भ्रम पसरवतील, पण कार्यकर्त्यांनी आपल्या विचारांशी आणि पक्षाशी ठाम राहिले पाहिजे. त्यादृष्टीनेच निवडणुकीत काम करायचे आहे.’ आपण कोरोनोच्या काळात जनतेचे प्राण वाचविण्यासाठी काम केले. जाती-धर्माचा विचार केला नाही. जनसेवा हा एकमेव उद्देश होता. ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण ठेवले,’ असेही ते म्हणाले. निवडणुकीत नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्कावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.