खेळाडूंच्या प्रोत्साहनाकरिता मनपाची ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’

– मागील 3 वर्षातील कामगिरीच्या आधारे मिळणार 50 हजार ते दोन लाख पर्यत आर्थिक सहाय्य

नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून मनपाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या योजनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त खेळाडूंना ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

मनपाच्या या योजनेकरिता नियमावली निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यानुसार ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, एशियन गेम्स, युथ ऑलिम्पिक, पॅरा एशियन स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ज्यूनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, ज्यूनिअर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप, राष्ट्रीय स्पर्धा (नॅशनल गेम्स), ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होउन पदकांची कमाई केलेल्या खेळाडूंना योजनेचा लाभ मिळणार आहे.

उपरोक्त स्पर्धांच्या अनुषंगाने नागपूर शहरातील खेळाडूंना योजनेद्वारे आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता वर्गिकरण करण्यात आलेले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जसे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धांमधील पदक विजेत्या खेळाडूंना २,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना २१ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा तसेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाद्वारे मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार जसे, ऑलिम्पिक क्रीडा प्रकार/आशियाई क्रीडा प्रकार/राष्ट्रकुल क्रीडा प्रकार या स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, अशी माहिती मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी दिली आहे. सदर खेळाडूंनी मागील तीन वर्षात सन २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ आर्थीक लाभ मिळविण्यास खेळाडूची मागील तीन वर्षाची कामगिरी (Performance) ग्राह्य धरुन मूल्यमापन (Evaluation) करण्यात येईल. किमान एकदा पदक मिळविणे बंधनकारक राहील.

अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठीत

उडान खेल प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीमध्ये समाजविकास विभाग, क्रीडा विभाग, महिला व बालकल्याण विभाग यापैकी एक उपायुक्त सदस्य म्हणून तसेच छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू किंवा ऑलिम्पियन किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू यापैकी एक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. मनपाचे क्रीडा अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. गठीत करण्यात आलेली समिती मनपाकडे प्राप्त होणाऱ्या अर्जाची पाहणी करुन यादी अंतीम करतील. एखाद्या खेळाडूची कामगिरी त्याने सादर केलेल्या नियोजनानुसार समाधानकारक नसल्याचे आढळल्यास अनुदानाबाबत फेरविचार समितीमार्फत करण्यात येईल. तसेच सदर अनुदानाच्या रक्कमेचा दुरुपयोग केल्याचे निदर्शनास आल्यास अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्याचा अधिकार समितीला असेल. खेळाडूंना याबाबत आवश्यक ते बंधपत्र द्यावे लागेल.सदर योजनेचा अर्ज क्रिडा व सांस्कृतिक विभाग मनपा मुख्यालय 3 रा माळा सिव्हिल लाईन नागपूर येथे उपलब्ध राहिल.

योजनेकरिता अटी व शर्ती

१. कुटुंबाचे नागपूर महानगरपालिका क्षेत्रात किमान ५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचा पुरावा म्हणून मालमत्ताधारक असल्याचा चालु वर्षाचा मालमत्ता कर भरल्याबाबतची पावती/निवडणूक ओळखपत्र/मतदार यादीतील नाव/पाणीपट्टी विजबील/तीन वर्षाचा भाडे करारनामा/रेशनकार्ड/विवाह नोंदणी दाखला यापैकी कोणतेही दोन पुरावे सादर करावे लागेल.

२. आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट व व्हिसा सादर करणे बंधनकारक राहील.

३. अर्जासोबत खेळाडू असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाकडून प्राप्त प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.

४. भारतीय शालेय खेल महासंघ अथवा अधिकृत भारतीय खेळ संघटना यांच्यावतीने अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाल्याबाबत प्रमाणपत्र संबंधित खेळाडूकडे असावे. निमंत्रित स्वरुपाच्या स्पर्धांसाठी झालेली निवड पात्र ठरणार नाही.

५. सदर योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळते करण्यात येईल.

६. अर्जासोबत अर्जदाराचा अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज फोटो लावणे आवश्यक राहील.

७. सदर खेळाचा लाभ प्रत्येक खेळाडूला केवळ एकदाच देण्यात येईल.

८. अर्जासोबत जोडण्यात आलेले सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावेत.

९. दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सदर योजनेचा लाभ मंजूर करणे अथवा नाकारणे तसेच अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अंतिम अधिकार मा. आयुक्त यांना राहील.

१०. क्रीडा मंडळे, संस्था, निमशासकीय संस्था यांनी आयोजित केलेल्या स्पर्धामधील प्रमाणपत्रे क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

११. क्रीडा शिष्यवृत्ती मिळण्याकरिता दिलेल्या मुदतीत विहित नमुन्यात आवश्यक कादपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

१२. अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची आढळल्यास क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार नाही.

१३. क्रीडा शिष्यवृत्तीचा वापर क्रीडा विकासासाठी करणे आवश्यक आहे.

१4. क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेबाबत विद्यार्थी खेळाडूंस हक्क सांगता येणार नाही.

१5. क्रीडा शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन मनपाच्या संकेतस्थळावर किंवा क्रीडा व सांस्कृतीक विभागात उपलब्ध करुन देण्यात येईल.

१6. विविध खेळात प्राविण्य मिळविले तरी क्रीडा शिष्यवृत्ती एकदाच देय राहील.

१7. क्रीडा शिष्यवृत्तीच्या धोरण, नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अथवा वाढ किंवा घट करण्याचा अथवा शिथिल करण्याचा अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना राहील.

महत्वाचे नियम

१. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खुल्या वरिष्ठ गटातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य अथवा क्रीडा शिष्यवृत्ती यासाठी संबंधित खेळ संघटनेचे प्रमाणपत्र यांचे झेरॉक्स प्रत सत्यप्रत करुन सादर करणे आवश्यक आहे.

२. अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची आढळल्यास आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही. फसवणूक करुन आर्थिक सहाय्य अथवा क्रीडा शिष्यवृत्ती घेतल्यास ती कायदेशीर कारवाई करुन वसूल केली जाईल.

३. आंतरराष्ट्रीय जागतिक मानांकन क्रीडा स्पर्धेत प्रविण्य मिळविलेल्या खेळाडूंनी संबंधित क्रीडा संघटनेमार्फत अर्ज केल्यास, अशा खेळाडूंनाही वरीलप्रमाणे आर्थिक सहाय्य देय राहील. (उदा. बॅडमिंटन, लॉन टेनिस, बुद्धिबळ इ.)

४. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खुल्या वरिष्ठ गटातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य अथवा क्रीडा शिष्यवृत्ती घेणेपूर्वी संबंधित खेळाडूने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमून्यात करारनामा करुन द्यावा लागेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही - आमदार देवेंद्र भुयार 

Wed Sep 4 , 2024
– गव्हानकुंड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत शेतकाऱ्यांसोबत पोळा साजरा !  वरुड :- मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी गव्हाणकुंड येथे स्वतः बैलांची सजावट व पूजन करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या कृषी संस्कृतीत बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे. शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही. शेतकरी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com