– राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस समारोहात सन्मान : मनपा व जिल्हा आयुष कक्षाचे आयोजन
नागपूर :- सहाव्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवसाच्या अनुषंगाने 18 नोव्हेंबरला अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषदेच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा आयुष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी मनपाच्या महाल येथील राजे रघुजी भोसले सभागृह (टाऊन हॉल) येथे सहावा राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद राजघाट नवी दिल्लीचे महामंत्री डॉ. अवधेशकुमार मिश्रा यांनी भूषविले. मंचावर कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, जिल्हा आयुष कक्ष अधिकारी डॉ. सुरेश मोटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, विशेष मार्गदर्शक प्रयास संस्था अमरावतीचे संचालक डॉ. अविनाश सावजी, कार्यक्रमाचे समन्वयक मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, संयोजक डॉ. धनलाल शेंदरे, निमंत्रक निखिल भुते उपस्थित होते.
प्राकृतिक चिकित्सा अर्थात निसर्गोपचार क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल डॉ. विजय जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद राजघाट नवी दिल्लीचे महामंत्री डॉ. अवधेशकुमार मिश्रा यांनी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवसाच्या शुभेच्छा देत परिषदेचे कार्य अधोरेखित केले. त्यांनी प्राकृतिक चिकित्साच्या भविष्यतील वाटचालीबद्दल देखील मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी समाज स्वास्थ्यात निसर्गोपचाराचे मोठे योगदान असल्याचे मत मांडले. नागपूर जिल्ह्यात आयुष रुग्णालय नसल्याची खंत लवकरच दूर होणार असून मानकापूर येथील शासकीय मनोरुग्णालयाजवळील जागेवर आयुष रुग्णालय निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी प्राकृतिक चिकित्सा म्हणजे काय व त्याच्या इतिहासाबाबत विवेचन केले. जिल्हा आयुष कक्ष अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांनी आयुष विभागाद्वारे नागपूर शहर आणि जिल्ह्यात सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमातील चर्चासत्रात इंजि. रविकिरण महाजन आणि डॉ. श्रद्धा प्रशांत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे संयोजक डॉ. धनलाल शेंदरे यांनी सहाव्या प्राकृतिक चिकित्सा दिवसाची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे संचालन पंकज शुक्ला यांनी केले व आभार निखिल भूते यांनी मानले. कार्यक्रमात प्राकृतिक चिकित्सा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून उपस्थितांना निसर्गोपचाराचे महत्व पटवून दिले.