– जाणीवपूर्वक करारातील अटी-शर्तीची पायमल्ली केल्याबद्दल मागितले स्पष्टीकरण
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा नागपूर शहरात कचरा संकलन करणाऱ्या मे.ए.जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला बुधवारी (ता.२०) रोजी नोटीस बजाविण्यात आली असून, जाणीवपूर्वक करारातील अटी-शर्तींची पायमल्ली केल्याबद्दल सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मे.ए.जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीला नोटीस बजाविली आहे.
मागील पाच वर्षांपासून मे.ए.जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन आणि नेहरूनगर झोन या पाच झोन क्षेत्रातील घराघरातील वर्गीकृत कचरा संकलित करुन वाहतूक करण्याची जबाबदारी आहे. यासंदर्भात मनपा आणि एजन्सी यात करारनामा झाला आहे. त्यानुसार एजन्सीला घराघरातील वर्गीकृत कचरा संकलित करुन भांडेवाडी येथे पुढील प्रक्रियेकरिता पाठवायचा आहे. तसेच मृत जनावरांची उचल करून ते स्वतंत्र वाहनाद्वारे भांडेवाडीत पोहोचायचे आहेत. पण बुधवार (ता२० रोजी) एजन्सीचे वाहन MH-३१-FC-४५४३ भांडेवाडी येथे पोहचविल्यानंतर वाहन रिकामे करताना वाहनात माती मिश्रीत कचरा व सोबत मृत जनावर असल्याचे आढळून आले. यासंदर्भात पंचनामा करण्यात आला. त्यात जाणीवपूर्वक करारातील अटी-शर्तीची पायमल्ली केल्याचे मनपा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. यापूर्वी कचऱ्यासोबत माती उचल केल्यामुळे एजन्सीला २७ लाखांचा दंड लावण्यात आला होता.
असे कार्य जाणीवपूर्वक होत असल्याने मे.ए.जी.इन्व्हायरो इन्फ्रा प्रा.लि. एजन्सी सोबतचा करारनामा रद्द करण्याबाबत कार्यवाही का करण्यात येवू नये? याबाबत सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. स्पष्टीकरण प्राप्त न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी एजन्सीला दिले आहे.