140 किलो सिंगल युज्ड प्लॅस्टिक जप्त
नागपूर :- राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केल्यापासून नागपूर महानगरपालिका हद्दीत प्रतिबंधात्मक सिंगल युज्ड प्लास्टिक बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. त्यानुसार सिंगल युज्ड प्लास्टिक बाळगणाऱ्या वेंडर्स, हॉकर्स, किराणा दुकान अशा १६३४ विक्रेत्यांकडून आजवर 140 किलो इतका सिंगल युज्ड प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे.
सिंगल युज्ड प्लास्टिक पिशवी पर्यावरणासाठी घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. याचं उद्देशाने नागपूर महानगपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वाखाली उपद्रव शोध पथक कारवाई करित आहे. प्रतिबंधात्मक सिंगल युज्ड प्लास्टिक बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर मनपाच्या दहाही झोननिहाय कार्यवाही केल्या जात आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.15) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमाननगर, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल हनुमाननगर झोन अंतर्गत मेडिकल चौक येथील न्यू अर्थासा मेडिकल स्टोअर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोन अंतर्गत गवळीपुरा येथील यादव ट्रेडिंग यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग नं.20, नाईक तलाव येथील संजय स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत कळमणा रोड येथील गोपिचंद किराणा स्टोअर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत प्रभाग नं.17, प्लॉट नं. 31, उंटखाना चौक येथील Turnion vision pvt.ltd यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच प्रभाग न.33, कुकडे ले-आऊट येथील दिनेश मेश्राम यांच्याविरुध्द रस्त्यालगत टिनशेड बांधुन अतिक्रमण केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.