– एलएलबी अभ्यासक्रमात २ सुवर्ण पदक
– महामहिम राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत झाला होता गौरव
चंद्रपूर :- एलएलबी अभ्यासक्रमात २ सुवर्ण पदके मिळविणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता चिन्मय प्रदीप देशपांडे यांचा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते १२ जुलै रोजी मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला.
भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ०५ जुलै २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पार पडलेल्या दहाव्या दीक्षांत सोहळ्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला होता. चंद्रपूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता चिन्मय देशपांडे यांनी यावर्षी परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण तर मिळविलेच सोबतच यापुर्वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांपेक्षाही अधिक गुण प्राप्त केले असल्याने त्यांना राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत २ सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले होते.
मनपातर्फे आयोजित सत्कारप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी सांगितले की, आपण सर्वच विद्यार्थीदशेत असतांना अभ्यास करतो मात्र तीच लय नोकरी करतांना कायम ठेवणे सोपे नाही. मनपाचे अधिकारी-कर्मचारी आपले काम सांभाळुन शिक्षणात अग्रेसर होण्याचा प्रयत्न करतात ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. शहर अभियंता महेश बारई यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.