नागपूर :- काही समाजकंटकांनी सोमवारला रात्री मध्य नागपूर भागात केलेल्या जाळपोळ व तोडफोडीनंतर नागपूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांनी कर्तव्यावरून रात्रीच तो परिसर स्वच्छ करून कर्तव्य तत्परतेचे उदाहरण घालून दिले.
नागपुरातील हंसापुरी, चिटणीस पार्क, अग्रसेन चौक, शिर्के गल्ली, भालदारपुरा, सेंट्रल एव्हेन्यू, मोमीनपुरा व शिवाजी पुतळा या परिसरात सोमवारला रात्री अचानकपणे दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला. यात अनेक गाड्या जळून खाक झाल्या तसेच अनेक सार्वजनिक संपत्तीचे सुद्धा नुकसान झाले. वाहनांच्या काचा फोडल्याने रस्त्यावर खच पडला होता. वाहनांच्या टायर चे तुकडे रस्त्यावर फेकलेले होते. समाजकंटकाच्या या कृत्यामुळे या परिसरातील रस्त्यावर काच, दगड व इतर वस्तूंचा खच पडला होता. यामुळे रहदारीला अवरोध निर्माण झाला होता.
या तणावग्रस्त परिस्थिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विभागाचे कर्मचारी रात्रीच कर्तव्यावर हजर झाले व या परिसरातील सर्व रस्त्यांवर या समाजकंटकांच्या कृत्यामुळे सर्व भागात कचर्याचे ढिग जमा झाले होते. हे रस्ते रहदारीसाठी योग्य करणे आवश्यक होते. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली. महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याशी चर्चा करून या भागात तात्काळ घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ तैनात करण्याचा निर्णय घेतला. या आणिबाणीच्यावेळी कर्मचार्यांनी आपले कर्तव्य बजावले. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जवळपास ५० कर्मचार्यांनी या मोहिमेत भाग घेतला. यामुळे मंगळवारला सकाळी या परिसरात रहदारीला कोणताही त्रास नागरिकांना झाला नाही. महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. चौधरी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या कर्मचार्यांचे अभिनंदन केले.