– विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यास उपक्रम
– टाकाऊ बनणार आकर्षक टिकाऊ वस्तू
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील सर्व महाविद्यालयांसाठी टाकाऊपासून टिकाऊ (बेस्ट फ्रॉम वेस्ट) स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
आयुक्त विपीन पालीवाल यांच्या कल्पनेतुन आयोजीत करण्यात आलेल्या या स्पर्धेत तंत्रशिक्षण संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलीटेक्निक कॉलेज, आयटीआय व इतर संस्थाना यात सहभागी करून घेण्यात आले असुन यशस्वी स्पर्धकांना 71 हजार, 51 हजार,31 हजार रुपयांचे अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणुन 5 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे याद्वारे विद्यार्थ्यांची काही नवीन करण्याची क्षमता व कल्पकतेला प्रोत्साहन मिळणार असुन टाकाऊ वस्तूंना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक आकर्षक टिकाऊ वस्तू बनविण्यात येणार आहे.या उपक्रमाद्वारे शहरात गोळा होणाऱ्या ई-कचऱ्याचा समाजोपयोगी प्रकल्प, लघुमॉडेल किंवा मोठे मॉडेल तयार करण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. स्पर्धेत विद्यार्थ्यांना तुटलेले बांधकाम साहित्य (विटा, सिमेंट, लोखंडी रॉड्स), लाकडी आणि लोखंडी टेबल, खुर्चा, तुटलेले पलंग, अलमारी,पत्र्याच्या चादरी, प्लास्टिक कचरा, बॅनर, होर्डिंग्ज, अनधिकृत वस्तूंचे साहित्य जसे दुकानातील वस्तू, गोडाऊनमधील अवांछित वस्तू इत्यादींचा उपयोग करता येणार आहे. यासंबंधी प्राथमिक माहिती 2 डिसेंबर रोजी सर्व महाविद्यालयीन प्रतिनिधींना सभेद्वारे देण्यात आली असुन 12 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतील प्रकल्प सादरीकरण ,निवड व मान्यता देण्यासाठी सभा घेण्यात आली व त्यात मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांना 1 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत प्रकल्पाला मूर्त रूप देण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे या अभिनव उपक्रमात16 संस्थांनी आतापर्यंत सहभाग दर्शविला आहे.