मनपा आयुक्तांनी घेतला आपात्कालीन यंत्रणेच्या कामाचा आढावा

नागपूर :- पावसामुळे नागपूर शहरात निर्माण झालेल्या आपात्कालीन प्रसंगातून दिलासा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे कार्य निरंतर सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सोमवारी (ता.२२) मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर व प्रादेशिक आपत्ती मुख्य नियंत्रण कडून अग्निशमन विभाग येथे भेट दिली व सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.

शनिवारी २० जुलै रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले तर अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली. रविवार २१ जुलैपर्यंत अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, उद्यान विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाद्वारे मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. रस्त्यावर, परिसरात जमा झालेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला सारुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. तर आरोग्य विभाग, हिवताप व हत्तीरोग विभाग या विभागाद्वारे परिसरात फवारणी करून नागरिकांना आवश्यक औषधांचा देखील पुरवठा करण्यात आला. आज सोमवारी २२ जुलै रोजी अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये जमा असलेले पाणी काढण्याबाबत कार्य करण्यात आले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर व प्रादेशिक आपत्ती मुख्य नियंत्रण कडून अग्निशमन विभाग येथील नियंत्रण कक्षामध्ये भेट दिली व संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांनी शहरात अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे करण्यात आलेली कामे आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती आयुक्तांना दिली. मदतकार्य करण्यात आलेल्या भागांची यादी हिवताप व हत्तीरोग विभागाला सोपवून संबंधित भागात फवारणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

दोघांचा मृत्यू

शनिवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. हुडकेश्वर मार्गावरील सेंट पॉल स्कूल जवळील नाल्यामध्ये ८५ वर्षीय सुधा वेळुकर ही महिला वाहून गेली. याबाबत माहिती मिळताच सक्करदरा अग्निशमन केंद्राच्या पथकाद्वारे घटनास्थळी शोध मोहिम राबविण्यात आली. यात महिलेचा मृतदेह पथकाने बाहेर काढला. पुनापुर रोड भरतवाडा येथील नाल्यामध्ये वाहून गेल्याने ५२ वर्षीय भोजराज पटले या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुगत नगर व कळमना अग्निशमन केंद्राच्या पथकाने त्यांचे शव बाहेर काढले. याशिवाय भरतवाडा पवनगाव येथे, १२ वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेला. या घटनेची माहिती कळमना पोलिस स्टेशनमधून मिळताच सुगत नगर अग्निशमन व लकडगंज अग्निशमन पथकाद्वारे शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

या भागात मदतकार्य

गोधनी रोड झिंगाबाई टाकळी प्रकाश नगर चौक येथे एका घरामध्ये मुलगा बंद झालेला होता. घटनेची माहिती मिळताच सुगत नगर अग्निशमन केंद्राच्या पथकाने घटनास्थळी जाउन मुलाला सुखरुप बाहेर काढले. याशिवाय दीनदयाल नगर आजी आजोबा उद्यानात झाड पडले, आनंद अपार्टमेंट सक्करदरा येथे पाणी जमा, नरेंद्र नगर येथील देवतारे यांच्या घरात पाणी जमा, त्रिमुर्ती नगर येथील श्री. गजानन मंदिराजवळ पाणी जमा, अयोध्या नगर येथे श्याम प्रिंटर्स येथे पाणी जमा, भांडेवाडे येथील देवीदास चौकात पाणी जमा, व्यंकटेश नगर येथे पाणी जमा अशा विविध तक्रारी प्राप्त झाल्या. यावर नजीकच्या अग्निशमन केंद्रांनी घटनास्थळी जाउन पाणी बाहेर काढून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले. मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागा मार्फत मानेवाडा, बेसा, लकडगंज, नंदनवन, लक्ष्मीनगर, कळमना, अयोध्या नगर, मोहन नगर, सक्करदरा, सुगत नगर, हुडकेश्वर, नरसाळा, पिपळा गाव इतर भागात फवारणी करण्यात येत आहे. तसेच संतरा मार्केट, मारवाडी चाल, इंदिरा गांधीनगर, झापेडपट्टी येथे सुध्दा मनपा तर्फे फवारणी व स्वच्छता करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Mon Jul 22 , 2024
नवी दिल्ली :- आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. आजच्या पवित्र दिवशी एका महत्त्वपूर्ण सत्राचा प्रारंभ होत आहे आणि श्रावणातील या पहिल्या सोमवारच्या देशवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. संसदेचे हे सत्र सकारात्मक होवो,सृजनात्मक होवो आणि देशवासियांची स्वप्ने साकार करण्यासाठी एक मजबूत पायाभरणी करणारे होवो, याकडे देश अगदी बारकाईने लक्ष ठेवून पाहत आहे. मित्रांनो, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com