नागपूर :- नागपूर शहरात २३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित भागातील नागरिकांना मनपाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची दुय्यम प्रत मागणी केल्यास विनाशुल्क देण्यात येणार आहेत. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिपत्रक जारी केले असून पुरग्रस्त भागातील संबंधित नागरिकांना कागदत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले आहेत.
२३ सप्टेंबर २०२३ रोजी ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागपूर शहरातील ब-याच भागांमध्ये पाणी शिरून मालमत्तांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या भागाचे सर्वेक्षण करून मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे करण्यात येत आहेत. अनेक घरे पाण्याखाली आल्याने अनेकांचे नागपूर महानगरपालिकेशी संबंधीत प्रमाणपत्र, दाखले, दस्तऐवज खराब / नष्ट होण्याच्या तक्रारी मनपाला प्राप्त होत आहेत. कागदपत्रांअभावी नागरिकांची गैरसोय होउन त्यांच्या कामामध्ये अडचणी निर्माण होउ शकतात. ही बाब लक्षात घेत मनपा आयुक्तांनी महत्वाचा निर्णय घेतला.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांकडून मनपा संबंधीत कागदपत्रांच्या दुय्यम प्रतींची मागणी केल्यास अशा नागरिकांकडून नुकसानीच्या पंचनाम्याची प्रमाणित प्रत घेउन त्या प्रमाणपत्र, दाखले, दस्ताऐवजाची एक दुय्यम प्रत कार्यालयीन दस्ताऐवजावरुन तयार करुन ती विनाशुल्क संबंधीत नागरीकांना देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबंधित विभाग प्रमुख व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.