सार्वजनिक गणेश मंडळातून निर्माल्य संकलनासाठी मनपाचे रथ सज्ज.

प्रत्येक झोनमध्ये एक रथ : बुधवारपासून संकलन कार्य सुरू : आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडी

नागपूर : बुधवार ३१ ऑगस्टपासून सुरू होत असलेला गणेशोत्सव नागपूर शहरात पर्यावरणपूरकरित्या साजरा व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवश्यक ते सर्व कार्य करण्यात येत आहेत. या अंतर्गत गणेश मंडळ आणि घरगुती गणपतींचे निर्माल्य संकलन करण्यासाठी मनपाद्वारे ‘निर्माल्य रथ’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक रथाची व्यवस्था असून मंगळवारी (३० ऑगस्ट) मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारत परिसरात मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून निर्माल्य रथाचे लोकार्पण केले.

याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे रोहिदास राठोड, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, एजी एन्व्हायरोचे प्रकल्प संचालक डॉ.समीर टोणपे, बीव्हीजी चे प्रकल्प प्रमुख रमाकांत भोंबे आदी उपस्थित होते.

नागपूर शहरातील स्वच्छतेच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावणा-या एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांनी निर्माल्य रथाद्वारे निर्माल्य संकलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. बुधवार ३१ ऑगस्टपासून शहरातील विविध भागात झोननिहाय निर्धारित निर्माल्य संकलन वाहन फिरणार असून त्याद्वारे प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून निर्माल्य संकलन केले जाईल.

निर्माल्य रथ लोकार्पणप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यंदा कुठलेही निर्बंध नसल्याने, लोकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनानेही गणेशोत्सवात लोकांना पुरेशा सेवा पुरविण्यावर अधिक भर दिला आहे. नागपूरकरांनी सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणपतीचेही निर्माल्य पर्यावरण संवर्धनांच्या दृष्टीने, मनपा निर्माल्य रथात जमा करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निर्माल्य संकलन बॅगमध्ये होणार निर्माल्य संकलीत 

झोननिहाय दहा या निर्माल्य रथामध्ये, प्रत्येकी दहा निर्माल्य संकलन बॅग ठेवण्यात आल्या आहेत. एका बॅगमध्ये सुमारे चारशे किलो निर्माल्य संकलीत करण्याची क्षमता आहे. बॅगमध्ये निर्माल्य संकलित करून ते निर्माल्य रथामार्फत पुढील प्रक्रियेसाठी नेले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घरगुती गणपतीचे संकलीत केलेले निर्माल्य, आपल्या परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळात आणून द्यावे, ते सर्व संकलीत केलेले निर्माल्य मनपाचे निर्माल्य रथ रोज संकलीत करणार आहेत.सर्व मंडळांनी निर्माल्य संकल्नाचा कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी केले.

दहा झोनमध्ये दिवसभर फिरणार निर्माल्यरथ

शहरातील, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर, मंगळवारी या दहाही झोनमध्ये दिवसभर निर्माल्य रथ फिरणार आहेत. रोज संकलीत केलेले निर्माल्य त्याच दिवशी कंपोस्टींगसाठी भांडेवाडी प्रकल्पात सोडले जाणार आहे. याशिवाय, कृत्रिम तलाव परिसरात उभारलेले निर्माल्य कलशामध्ये जमा होणारे निर्माल्यही निर्माल्य रथातून संकलीत केले जाईल, अशी माहिती, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

निर्माल्यापासून खत निर्मिती

२०१९ मधील गणेशोत्सवात, नागपूर महानगरपालिकेने शहरातून, सुमारे १५० मॅट्रीक्स टन निर्माल्य संकलीत केले होते. यंदा सुमारे तीनशे मेट्रीक टन निर्माल्य संकलीत होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवातील निर्माल्याचे धार्मिक महत्व लक्षात घेता, हे निर्माल्य नेहमीच्या कच-याबरोबर न टाकता, जमा झालेल्या निर्माल्य भांडेवाडी येथील कंपोस्टींग प्लॅंटमध्ये स्वतंत्र्यरित्या संकलीत करून, त्यावर प्रक्रीया करून खत निर्मीती करण्यात येणार आहे. निर्माल्यापासून तयार झालेल्या या खताचा वापर मनपाच्या सर्व सार्वजनिक उद्यानात केला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपातर्फे विसर्जनासाठी २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी..

Wed Aug 31 , 2022
चंद्रपूर  – ३१ ऑगस्ट बुधवार रोजी श्रीगणेशाचे आगमन होणार असुन गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असुन मनपातर्फे विसर्जनासाठी २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आले आहे. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. घरगुती गणेशाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com