– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला उसळली गर्दी
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदने सादर केली. विशेष म्हणजे काही तरुणांनी नावीन्यपूर्ण कल्पना मांडल्या. काहींनी बहुमजली वाहनतळाचे प्रेझेंटेशन दिले. तर काही शाळकरी मुलांनी खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात ना. गडकरी यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होती. रस्ते, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक आदी क्षेत्रांशी संबंधित निवेदने ना. गडकरींना सोपविण्यात आली. यावेळी ना. गडकरी यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसंपर्क कार्यक्रमात दाखल झाले होते. तसेच दिव्यांग बांधवांनी कृत्रिम अवयवांची मागणी ना. गडकरींकडे केली. मंत्री महोदयांनी संबंधित निवेदने उपस्थित अधिकाऱ्यांना दिली व तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी काही नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज व पराक्रमी चिमाजी अप्पा यांची मूर्ती ना. गडकरी यांना भेट दिली. श्री संत भगवान बाबा यांची प्रतिमा काही भाविकांनी मंत्री महोदयांना भेट दिली. एका संस्थेने ड्रग्ज डिटेक्शनचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत केले आहे. त्याचे प्रेझेंटेशन मंत्री महोदयांना दिले. एका तरुणाने सीसीटीव्ही आणि एआयच्या माध्यमातून क्राईम डिटेक्शनचे मॉडेल विकसित केले आहे. त्याची माहिती या तरुणाने ना. गडकरी यांना दिली. मंत्री महोदयांनी तरुणाचे कौतुक करून अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीच्या सूचना केल्या.
चिमुकल्यांचे शिष्टमंडळ
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात समाजातील सर्व वर्गातील व सर्व वयोगटातील नागरिक येत असतात. मात्र आजच्या जनसंपर्काला चिमुकल्यांचे अर्थात शाळकरी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळही आले होते. या मुलांनी खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी ना. गडकरींकडे केली.