– तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप*
नागपूर :- विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग यावे, गुंतवणूक व्हावी यासाठी खासदार औद्योगिक महोत्सव हा मैलाचा दगड ठरला आहे. या महोत्सवात अनेक उद्योजक सहभागी झाले. या माध्यमातून विदर्भात आपण गुंतवणूक करू शकतो, हा विश्वास उद्योजकांमध्ये निर्माण झाला आहे. हा महोत्सव गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी व्यासपीठ ठरले असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचा आज समारोप झाला. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, खा. कृपाल तुमाने, खा. रामदास तडस, आ. सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, उद्योग क्षेत्रातील आनंद राठी, सुरेश शर्मा, राजेश बागडी, अतुल गोयल,विजय शर्मा, आशीष काळे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत या विचार मंथनाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने उद्योग विषयावर आधारित अतिशय चांगली चर्चासत्रे आणि सादरीकरण संत्रानगरीत पहायला आणि ऐकायला मिळाली. नागपुरचे प्रस्थापित उद्योगसमूह या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणा-या एका कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. नव्याने उद्योग क्षेत्रात पदार्पण करीत असलेल्या उद्योजकांचे स्टार्टअप्स या ठिकाणी पहायला मिळाले. स्टार्टअपला भेट दिल्यानंतर विदर्भातील मुले-मुली किती कल्पकतेने काम करीत असून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे स्टार्ट अप लोकोपयोगी ठरणार असल्याचे यातून दिसून आले. यातून ‘बिझनेस इकोसिस्टिम’ तयार होईल, असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
संरक्षण क्षेत्रात आपण आत्मनिर्भर झालो आहोत. संरक्षण उत्पादन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या माध्यमातून एक चांगली इकोसिस्टीम तयार झाली आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी संरक्षण उत्पादनांची निर्मिती होत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महोत्सवात राष्ट्रीय तसेच आंतराराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक, गुंतवणूकदार, तज्ज्ञ सहभागी झाले. विदर्भ हा आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. गडचिरोली आणि वाशीम हे जिल्हे मागास म्हणून ओळखले जातात. विदर्भ समृद्ध, संपन्न, शक्तीशाली व्हावा, रोजगार निर्मिती, अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.
नागपुरातील मिहान प्रकल्पात एक लक्ष रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यापैकी ६८ हजार जणांना थेट रोजगार देण्यात आला आहे. येत्या एका वर्षात अजून 50 हजार युवांना मिहानमध्ये रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.
पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पर्यटन क्षेत्राची सुद्धा एक इंडस्ट्री अशी ओळख आहे. पर्यटनातून रोजगार निर्मिती व्हावी हा शासनाचा उद्देश आहे. राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाला बळकटी मिळावी हा शासनाचा उद्देश आहे. कोरोनानंतर पर्यटन क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. नागरिक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. देशात पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वल आणण्याचा येत्या काळात प्रयत्न राहणार असल्याचे महाजन यावेळी म्हणाले. जल,जमीन,जंगलामुळे विदर्भात पर्यटनवाढीला वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीष काळे यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार राजेश रोकडे यांनी मानले. तीन दिवसाच्या या कार्यक्रमात विदर्भ विकासावर विविध सत्रामध्ये चर्चा झाली. विदर्भातील मोठ्या उद्योजकांनी यामध्ये भाग घेतला याशिवाय या उद्योजकांनी अनेक राष्ट्रीय कंपन्याशी सामंजस्य करार केले. विदर्भाच्या विकासासाठी प्रथमच अशा पद्धतीचे व्यासपीठ खासदार महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. भविष्यातही विदर्भाच्या विकासावर सांगोपांग चर्चा घेण्यात यावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.