नागपूर :- नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023 पर्यंत 13 दिवसाचे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे नागपुरात आयोजन केलेले आहे. हा पैसा जनतेचा असून या सार्वजनिक पैशावर कुठल्याही धर्माचा प्रचार-प्रसार करणारा कार्यक्रम होऊ नये.
विशेष असे की हिंदू धर्माचाच प्रचार-प्रसार करण्यासाठी हनुमान चालीसा पठण, रुद्र पठण, श्रीसूक्त पठण, हरिपाठ पठण, विष्णुसहस्त्र पठण, गीता पठण, सुंदरकांड पठण, श्रीरामरक्षा स्त्रोत पठण, मारुती स्त्रोत पठण, मनाचे श्लोक, गीतरामायण आदी प्रकारचे पठण दररोज सकाळच्या वेळेस केल्या जाणार आहे.
संविधान नाकारणाऱ्या भाजप संघाच्या मंडळींनी बहुजनांना मूर्ख बनवण्यासाठी व बौद्धांना खुश करण्यासाठी संविधान दिनी परित्राण पाठाचे पठणही करण्याचे आयोजन केले आहे. हा सर्व खेळ शासकीय पैशावर असल्याने याला आमचा आक्षेप आहे. खासदाराने शासकीय पैशावर व शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करू नये. करण्याचा एवढा शोक असेल तर त्यांनी खाजगीरीत्या आपल्या पक्षाच्या बॅनरवर व स्वखर्चाने करावा. शासकीय एकाही पैशाचा वापर केल्या जाऊ नये. अन्यथा कायदेशीर व कोर्टाचा आधार घ्यावा लागेल.
हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व संविधान दिनाचे कार्यक्रम देशभर सुरु असताना नागपुरातील खासदाराने आपल्या खासदार निधीतून धर्मांधता पसरविणारे कार्यक्रम घेणे हे मुळात चूक आहे. कारण खासदार निधी हा नागपूर लोकसभेत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा निधी आहे. एक बौद्ध व्यक्ति म्हणून व बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी या उपक्रमाचा निषेध करतो. व संबंधितांनी हा उपक्रम बंद करावा अशी सूचना करतो.
उत्तम शेवडे मा मीडिया प्रभारी महाराष्ट्र
प्रदेश बसपा