महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निप्पॉन स्टील सोबत सामंजस्य करार ४० हजार कोटींची गुंतवणूक; २० हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर आज महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे २० हजार प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, निप्पॉन स्टीलचे उपसंचालक कुबोटा सॅन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित हरलका आदी उपस्थित होते.

नुकतेच दावोस येथे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी एका प्रकल्पावर समाधान न ठेवता एकापेक्षा अधिक प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यात यावी अशी मुख्यमंत्र्यांनी मित्तल यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील लोह खाणींना जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान देणारा आहे. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्यात सुमारे ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ यामुळे औद्योगिक विकास वेगाने होत आहे. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज झालेला सामंजस्य करार हा अविस्मरणीय क्षण आहे. राज्यात आम्ही आपले स्वागत करतो. राज्यात असलेल्या पोषक वातावरणामुळे गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी सुमारे ३५ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प असून त्याद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष २० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार

Tue Jan 30 , 2024
– महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक; ६४ हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  मुंबई :- हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी रुपये एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामाध्यमातून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com